इंग्लंडमधील साउथविक आणि शोरहॅम क्रिकेट क्लबने खेळाडूंच्या सिक्स मारण्यावर बंदी घातली आहे. या बंदीच्या मागेही एक अतिशय रंजक कहाणी आहे. मैदानाजवळ राहणाऱ्या लोकांनी त्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय, सामना बघण्यासाठी आलेल्या लोकांना दुखापत, वाहनांचे नुकसान होण्याच्या घटनांमध्येही वाढ होत आहे.
या समस्येवरील तोडगा म्हणून, संबंधित क्रिकेट क्लबने एक अजब नियम बनवला आहे. जर एखाद्या खेळाडूकडून पहिला षटकार गेला, तर त्याकडे एक इशारा म्हणून बघितले जाईल आणि ज्या संघाच्या खेळाडूने षटकार मारला असेल त्या संघाला एकही धाव मिळणार नाही. मात्र, यानंतर दुसरा षटकार गेल्यास अथवा मारल्यास संबंधित खेळाडूला बाद दिले जाईल. क्लबच्या कोषाध्यक्षानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे.
या निर्णयासंदर्भात बोलताना साउथविक आणि शोरहॅम क्रिकेट क्लबचे कोशाध्यक्ष मार्क ब्रॉक्सअप म्हणाले, विम्याचे दावे आणि कायदेशीर प्रक्रियेमुळे होणारा खर्च टाळण्यासाठी हा नियम करण्यात आला आहे. पूर्वी क्रिकेट शांत वातावरणात खेळले जात होते. मात्र टी-20 आणि मर्यादित षटकांचे क्रिकेट आल्यानंतर या खेळात अधिक आक्रमकता आली आहे.
खरे तर, स्टेडियमजवळ राहणाऱ्या एका 80 वर्षीय व्यक्तीने म्हटले होते की, "आजकाल खेळाडूंमध्ये एवढा जोश आला आहे की, त्यांना षटकार मारण्यासाठी स्टेडियमही कमी पडत आहे. मात्र, या नव्या आणि अजब नियमामुळे संबंधित खेळाडूंमध्ये नाराजी आहे.