बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येण्याआधी पाकिस्तानमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. २१ ऑगस्टपासून पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला कसोटी सामना रावळपिंडीच्या मैदानात रंगणार आहे.
एक नाही तर दोघांना धोबीपछाड देण्याची संधी
पाकिस्तान विरुद्धची कसोटी मालिका बांगलादेशच्या ताफ्यातील शाकिब अल हसनसाठी अधिक खास ठरू शकते. कारण त्याला या मालिकेत एक नाही तर दोन दिग्गजांना धोबीपछाड देण्याची संधी आहे.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शाकिब अल हसनच्या खात्यात आतापर्यंत ७०३ विकेट्स आणि १४६२६ धावा जमा आहेत. पाकिस्तान दौऱ्यात अष्टपैलू खेळाडूकडे हरभजन सिंग आणि हर्षल गिब्स यांचे रेकॉर्ड मागे टाकण्याची संधी आहे.
भज्जीला ओव्हरटेक करण्याआधी डॅनियल व्हिटोरीचा विक्रम असेल निशाण्यावर
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शाकिब अल हसनच्या खात्यात आतापर्यंत ७०३ विकेट्स आणि १४६२६ धावा जमा आहेत. पाकिस्तान दौऱ्यात अष्टपैलू खेळाडूकडे हरभजन सिंग आणि हर्षल गिब्स यांचे रेकॉर्ड मागे टाकण्याची संधी आहे. या विक्रमाआधी न्यूझीलंडच्या डॅनियल व्हिटोरीचा विक्रम निशाण्यावर असेल. त्याच्या खात्यात ७०५ आंतरराष्ट्रीय विकेट्स आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन १३४७ विकेट्ससह अव्वलस्थानी आहे.
एका अर्धशतकासह या दोन स्टार फलंदाजांना टाकू शकतो मागे
शाकिब अल हसन याला फक्त गोलंदाजीतच नाही तर फलंदाजीतील काही विक्रम खुणावत आहेत. पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी मालिकेत शाकिबला दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर हर्षल गिब्सचा विक्रम मागे टाकण्याची देखील संधी असेल. हर्षल गिब्सनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १४६२१ धावा केल्या आहेत. फक्त ३५ धावा करताच शाकिब त्याला मागे टाकेल. याशिवाय न्यूझीलंडच्या मॅक्युलमलाही तो या दौऱ्यातच मागे टाकू शकतो. मॅक्युलम याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १४६७६ धावा केल्या आहेत. त्याला मागे टाकण्यासाठी शाकिबला एक अर्धशतक पुरेसे ठरेल.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील स्थान सुधारण्यासाठीची 'कसोटी'
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी दोन्ही संघांना ही द्विपक्षीय मालिका महत्त्वाची ठरेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत पाकिस्तानचा संघ सहाव्या स्थानी आहे. ते घरच्या मैदानातील मालिका गाजवून आपले स्थान सुधारण्यासाठी प्रयत्नशील असतील. दुसरीकडे बांगलादेशचा संघ ९ व्या स्थानावरून आपलं स्थान सुधारण्यासाठी प्रयत्नशील असेल.