बांगलादेशचा दणदणीत विजय, अफगाणिस्तानची हार! Super 4 ची चुरस अधिक रंगतदार 

BAN vs AFG Live Marathi Update : पहिल्याच सामन्यात श्रीलंकेकडून हार पत्करलेला बांगलादेशने दमदार पुनरागमन केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 10:49 PM2023-09-03T22:49:21+5:302023-09-03T22:49:37+5:30

whatsapp join usJoin us
BAN vs AFG Live Marathi Update : Afghanistan 245-all out, Bangladesh win by 89 runs to keep their Super Four hopes alive | बांगलादेशचा दणदणीत विजय, अफगाणिस्तानची हार! Super 4 ची चुरस अधिक रंगतदार 

बांगलादेशचा दणदणीत विजय, अफगाणिस्तानची हार! Super 4 ची चुरस अधिक रंगतदार 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

BAN vs AFG Live Marathi Update : पहिल्याच सामन्यात श्रीलंकेकडून हार पत्करलेला बांगलादेशने दमदार पुनरागमन केले.  मेहिदी मिराझ व नजमूल शांतोच्या शतकांच्या जोरावर बांगलादेशने ३३४ धावांचा डोंगर उभा केला. पण, अफगाणिस्तानच्या फलंदाजांना हा भार पेलवला नाही आणि त्यांची ८९ धावांनी हार झाली. आशिया चषकाच्या ब गटात श्रीलंका आणि बांगलादेश यांचे प्रत्येकी २ गुण झाले आहेत. अफगाणिस्तानला Super 4 च्या शर्यतीत कायम राहायचे असेल तर त्यांना साखळी फेरीत श्रीलंकेविरुद्ध मोठा विजय मिळवावा लागेल. 

सलामीवीर मेहिदी हसन मिराझ ( Mehidy Hasan Miraz) आणि नजमूल होसैन शांतो ( Najmul Hossain Shanto) यांनी वैयक्तिक शतक झळकावले. मोहम्मद नईम ( २८) व मिराझ सलामीला आले आणि दोघांनी पहिल्या विकेटसाठी ६० धावा जोडल्या. नजमूल व मिराझ यांनी तिसऱ्या विकेटसाठी १९४ धावांची विक्रमी भागीदारी केली. मिराझ हाताच्या दुखापतीमुळे ११९ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ११२ धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. मजमूल ४५ व्या षटकात दुर्दैवीरित्या रन आऊट झाला. त्याने १०५ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह १०५ धावा केल्या. बांगलादेशने ५० षटकांत ५ बाद ३३४ धावांचा डोंगर उभा केला. शाकिब अल हसनने १८ चेंडूंत नाबाद ३२ धावा चोपल्या.


प्रत्युत्तरात, अफगाणिस्तानचा सलामीवीर रहमनुल्लाह गुरबाज ( १) दुसऱ्या षटकात बाद झाला. इब्राहिम झाद्रान व रहमत शाह ( ३३) यांनी ७८ धावांची भागीदारी करून डाव सावरला. तस्कीन अहमदने ही भागीदारी तोडली. कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी आणि झाद्रान यांनी चांगली खेळी करून अफगाणिस्तानला सामन्यात कायम ठेवले होते. झाद्रान १० चौकार व १ षटकारासह ७५ धावा करून माघारी परतला. २० षटकांत १८१ धावा अफगाणिस्तानला करायच्या होत्या अन् सर्व भीस्त कर्णधारावर होत्या. त्यानेही अर्धशतक झळकावून संघर्ष सुरू ठेवला, परंतु दुसऱ्या बाजूने नजिबुल्लाह झाद्रान ( १७) लगेच माघारी परतला. मेहिदी हसन मिराझने ही विकेट मिळवून दिली.


शाहिदीकडे फटकेबाजीशिवाय दुसरा पर्याय नव्हता अन् त्या प्रयत्नात त्याने ५१ धावांवर झेल दिला. शौरीफूल इस्लामने ही महत्त्वाची विकेट मिळवली. मोहम्मद नबी ( ३), गुलबदीन नईब ( १५) आणि करिम जनत ( १) हे फेल झाल्याने राशीद खानवर दडपण आले. ३६ चेंडूंत ९१ धावांची गरज असताना मुजीब उर रहमानने तस्कीन अहमदचा चेंडू सीमापार पाठवला, परंतु त्याचा पाय यष्टिंवर आदळला. त्यामुळे मुजीबला माघारी जावे लागले. त्याच षटकात राशीद २४ ( १५ चेंडू) धावांवर झेलबाद झाला. अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ २४५ धावांत तंबूत परतला अन् बांगलादेशने ८९ धावांनी सामना जिंकला. तस्कीनने ४ विकेट्स घेतल्या. 

Web Title: BAN vs AFG Live Marathi Update : Afghanistan 245-all out, Bangladesh win by 89 runs to keep their Super Four hopes alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.