BAN vs AFG Live Marathi Update : आशिया चषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात श्रीलंकेकडून हार पत्करलेला बांगलादेशचा संघ करो वा मरो अवस्थेत आहे. ब गटातील दुसऱ्या लढतीत अफगाणिस्तानविरुद्ध आज त्यांनी सर्वस्व पणाला लावले अन् जबरदस्त खेळ करून दाखवला. सलामीवीर मेहिदी हसन मिराझ ( Mehidy Hasan Miraz) आणि नजमूल होसैन शांतो ( Najmul Hossain Shanto) यांनी वैयक्तिक शतक झळकावून बांगलादेशसाठी धावांचा डोंगर उभा केला. ४३व्या षटकात मिराझ मनगटाने हाताला दुखापत झाल्याने रिटायर्ड आऊट होण्याचा निर्णय घेतला.
मोहम्मद नईम व मिराझ सलामीला आले आणि दोघांनी पहिल्या विकेटसाठी ६० धावा जोडल्या. मुजीब उर रहमानने ही जोडी तोडली अन् नईम २८ धावांवर त्रिफळाचीत झाला. तोवहिद हृदय भोपळ्यावर गुलबदीन नईबच्या गोलंदाजीवर बाद झाला. पहिल्या सामन्यात ८९ धावांची खेळी करणाऱ्या नजमूलने अफगाणिस्ताच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. नजमूल व मिराझ यांनी तिसऱ्या विकेटसाठी १९४ धावांची विक्रमी भागीदारी केली. मिराझ हाताच्या दुखापतीमुळे ११९ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ११२ धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. मजमूल ४५ व्या षटकात दुर्दैवीरित्या रन आऊट झाला. त्याने १०५ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह १०५ धावा केल्या.
मुश्फिकर रहिमही १५ चेंडूंत २५ धावांवर रन आऊट झाला. शाकिब अल हसन व शमीम होसैन यांनी शेवटच्या षटकांत चांगली फटकेबाजी केली. शमीम ११ धावांवर रन आऊट झाला. बांगलादेशने ५० षटकांत ५ बाद ३३४ धावांचा डोंगर उभा केला. शाकिबने १८ चेंडूंत नाबाद ३२ धावा चोपल्या.