BAN vs AFG Test : अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात यजमान बांगलादेशने ५४६ धावांनी विजय मिळवला. २१ व्या शतकातील कसोटी क्रिकेटमधील हा सर्वात मोठा विजय ठरला, तर कसोटी क्रिकेट इतिहासातील तिसरा मोठा विजय ठरला. अफगाणिस्तानचा दुसरा डाव ११५ धावांवर गुंडाळून बांगलादेशने हा पराक्रम केला.
बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना ३८२ धावा केल्या. मजमूल शांतोने १४६ धावांची खेळी केली, तर महमुदूल हसन जॉय ( ७६), मुश्फीकर रहीम ( ४७) व मेहिदी हसन ( ४८) यांनी त्याला चांगली साथ दिली. निजत मसूदने ७९ धावांत ५ फलंदाज बाद केले. इबादत होसैन ( ४-४७), शोरिफूल इस्लाम ( २-२८), तैजूल इस्लाम ( २-७) व मेहिदी हसन ( २-१५) यांनी अफगाणिस्तानचा पहिला डाव १४६ धावांवर गुंडाळला. बांगलादेशच्या दुसऱ्या डावात मजमूल ( १२४) व मोमिनूल हक ( १२१) यांनी शतकं झळकावली. जाकीर हसन ( ७१) व कर्णधार लिटन दास ( ६६) यांनीही हात मोकळे केलं अन् दुसरा डाव ४ बाद ४२५ धावांवर घोषित करून अफगाणिस्तानसमोर ६६२ धावांचे लक्ष्य ठेवले.
हे लक्ष्य गाठता येणार नाही याची कल्पना अफगाणिस्तानलाही होती. त्यामुळे त्यांचा सामना ड्रॉ करण्याचा प्रयत्न होता. पण, तस्किन अहमद ( ४-३७) व शोरिफूल इस्लाम ( ३-२८) यांनी अफगाणिस्तानला धक्के दिले अन् दुसरा डाव ११५ धावांवर गुंडाळला. बांगलादेशने ५४६ धावांनी विजय मिळवून ऑस्ट्रेलियाला १९११ सालचा ( ५३० वि. दक्षिण आफ्रिका) विक्रम मोडला. १९२८ मध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर ६७५ आणि १९३४ मध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर ५६२ धावांनी विजय मिळवला होता.
Web Title: BAN vs AFG Test : Bangladesh beat Afghanistan by 546 runs in the Test Match, This is the Biggest win in terms of runs in 21st century and third biggest wins in the history of Test Cricket.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.