BAN vs AFG Test : अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात यजमान बांगलादेशने ५४६ धावांनी विजय मिळवला. २१ व्या शतकातील कसोटी क्रिकेटमधील हा सर्वात मोठा विजय ठरला, तर कसोटी क्रिकेट इतिहासातील तिसरा मोठा विजय ठरला. अफगाणिस्तानचा दुसरा डाव ११५ धावांवर गुंडाळून बांगलादेशने हा पराक्रम केला.
बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना ३८२ धावा केल्या. मजमूल शांतोने १४६ धावांची खेळी केली, तर महमुदूल हसन जॉय ( ७६), मुश्फीकर रहीम ( ४७) व मेहिदी हसन ( ४८) यांनी त्याला चांगली साथ दिली. निजत मसूदने ७९ धावांत ५ फलंदाज बाद केले. इबादत होसैन ( ४-४७), शोरिफूल इस्लाम ( २-२८), तैजूल इस्लाम ( २-७) व मेहिदी हसन ( २-१५) यांनी अफगाणिस्तानचा पहिला डाव १४६ धावांवर गुंडाळला. बांगलादेशच्या दुसऱ्या डावात मजमूल ( १२४) व मोमिनूल हक ( १२१) यांनी शतकं झळकावली. जाकीर हसन ( ७१) व कर्णधार लिटन दास ( ६६) यांनीही हात मोकळे केलं अन् दुसरा डाव ४ बाद ४२५ धावांवर घोषित करून अफगाणिस्तानसमोर ६६२ धावांचे लक्ष्य ठेवले.