Join us  

BAN vs IRE : वर्ल्ड कप विजेत्यांना धक्का देणाऱ्या बांगलादेशला १४ वर्षांनी आयर्लंडने पाणी पाजलं

ban vs ire t20 : आयर्लंडच्या संघाने ट्वेंटी-२० मध्ये बांगलादेशचा दारूण पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 5:19 PM

Open in App

BAN vs IRE 3rd T20 । नवी दिल्ली : आयर्लंड आणि बांगलादेश (IRE vs BAN) यांच्यातील अखेरच्या ट्वेंटी-२० सामन्यात आयर्लंडने विजय मिळवून इतिहास रचला आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात आयर्लंडने स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बांगलादेशला पराभवाची धूळ चारली. आयर्लंडकडून पॉल स्टर्लिंगने ७७ धावांची स्फोटक खेळी केली आणि सामना आपल्या नावावर केला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना केवळ १२५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. 

१२५ धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडने अवघ्या १४ षटकांत लक्ष्य गाठले. आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंगने मालिकेतील अखेरच्या सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पडला. त्याने १८७.८० च्या स्ट्राईक रेटने धावा करताना ४१ चेंडूत ७७ धावा कुटल्या. यादरम्यान त्याने १० चौकार आणि ६ षटकार लगावले. म्हणजेच स्टर्लिंगने केवळ १६ चेंडूत मोठ्या फटकारांच्या जोरावर ६४ धावा केल्या.

बांगलादेशी फलंदाज चीतपटतिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात बांगलादेशचे फलंदाज पूर्णपणे चीतपट झाल्याचे पाहायला मिळाले. शमीम हुसैन वगळता कोणत्याच फलंदाजाला मोठी खेळी करता आला नाही. शमीमने अर्धशतकी खेळी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला कोणत्याच इतर फलंदाजाची साथ मिळाली नाही, त्याने ४२ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकार ठोकून ५१ धावा केल्या. खरं तर बांगलादेशच्या ७ फलंदाजांना दहाचा आकडा देखील गाठता आला नाही. 

आयर्लंडच्या गोलंदाजांनी केली कमालआयर्लंडच्या घातक गोलंदाजीसमोर बांगलादेशचा संघ निर्धारित २० षटके देखील खेळू शकला नाही. आयर्लंडकडून मार्क अडायने ४ षटकांत २५ धावा देत सर्वाधिक ३ बळी घेतले, तर मॅथ्यू हम्फ्रेंसला २ बळी घेण्यात यश आले. याशिवाय फिआन्न हॅंड, हॅरी टेक्टर, कर्टिक केम्फ, बेन व्हाइट आणि गॅरेथ डेलानी यांनी प्रत्येकी १-१ बळी घेऊन संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. लक्षणीय बाब म्हणजे आयर्लंडने हा सामना जिंकला असला तरी बांगलादेशने ही मालिका २-१ ने जिंकली आहे. तसेच आयर्लंडने बांगलादेशला १४ वर्षांनी नमवून हा सामना अविस्मरणीय केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :बांगलादेशआयर्लंडटी-20 क्रिकेटआंतरराष्ट्रीय क्रिकेटआयसीसी
Open in App