वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडला पुन्हा एकदा उपांत्य फेरीत घेऊन गेल्यानंतर केन विलियम्सन (Kane Williamson ) कसोटी क्रिकेट गाजवतोय. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात केनच्या शतकामुळे न्यूझीलंडला मान वर करून मैदानावर उभे राहता आले आहे. पण, तरीही बांगलादेशने पहिल्या डावात वर्चस्व मिळवले आहे. बांगलादेशच्या पहिल्या डावातील ३१० धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसअखेर ८ बाद २६६ धावा केल्या आहेत. न्यूझीलंड अजूनही ४४ धावांनी पिछाडीवर आहेत.
टॉम लॅथम ( २१) व डेव्हॉन कॉनवे ( १२) हे दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यामुळे किवींची अवस्था २ बाद ४४ अशी झाली होती. कर्णधार केनने तिसऱ्या विकेटसाठी हेन्री निकोल्ससह काहीकाळ उभा राहिला. निकोल्स ( १९) बाद झाल्यावर डॅरील मिचेलने कर्णधाराला साथ दिली. मिचेलने ५४ चेंडूंत ४१ धावा केल्या. टॉम ब्लंडल ( ६) माघारी परतल्याने न्यूझीलंड पुन्हा अडचणीत सापडला होता. पण, केन उभा राहिला आणि यावेळी त्याला ग्लेन फिलिप्सची ( ४२) साथ मिळाली.
केनने २०५ चेंडूंत ११ चौकारांच्या मदतीने १०४ धावा केल्या. केनचे हे कसोटीतील २९वे शतक ठरले आणि विराट कोहलीच्या शतकाशी त्याने बरोबरी केली. न्यूझीलंडकडून कसोटीत सलग ४ शतक झळकावणारा केन हा पहिला फलंदाज ठरला, तर अँड्य्रू जोन्स यांच्यानंतर कसोटीच्या सलग तीन डावांत शतक झळकावणारा दुसरा किवी फलंदाज ठरला. केनने १५६ इनिंग्जमध्ये २९ शतक पूर्ण करून सुनील गावस्कर व मॅथ्यू हेडन ( १६६) यांना मागे टाकले. डॉन ब्रॅडमन ( ७९ इनिंग्ज), सचिन तेंडुलकर ( १४८), स्टीव्ह स्मिथ ( १५५) हे केनच्या पुढे आहेत.