सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असलेल्या बांगलादेशने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात यजमान न्यूझीलंडला जबर धक्का दिला आहे. या सामन्यात बांगलादेशच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत न्यूझीलंडला अवघ्या ९८ धावांत गुंडाळले. त्यानंतर बांगलादेशच्या फलंदाजांनी ९९ धावांच्या आव्हानाचा अवघ्या १५.१ षटकांत ९ विकेट्स राखून यशस्वीरीत्या पाठलाग केला. मात्र पहिले दोन्ही सामने जिंकलेले असल्याने न्यूझीलंडने तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका २-१ अशा फरकाने खिशात टाकली.
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर तंझीम हसन शाकिब आणि शोरीफूल इस्लाम यांच्या भेदक माऱ्यासमोर न्यूझीलंडची दाणादाण उडाली. या दोघांनीही एकापाठोपाठ एक धक्के दिल्याने न्यूझीलंडची अवस्था ६ बाद ७० अशी झाली होती. त्यानंतर अष्टपैलू सौम्या सरकारने तीन बळी घेत न्यूझीलंडचं शेपूट कापून काढलं. तर मुस्तफिजूर रहमाननं अखेरचा बळी टिपून न्यूझीलंडचा डाव ९८ धावांवर संपुष्टात आणला. न्यूझीलंडकडून विल यंगने २६ तर टॉम लॅथमने २१ धावांचे योगदान दिले. तर बांगलादेशकडून तंझीम हसन शाकिब, शोरीफूल इस्लाम आणि सौम्या सरकार यांनी प्रत्येकी तीन विकेट्स टिपले. तर मुस्तफिजूर रहमानने एक बळी टिपला.
या आव्हानाचा पाठलाग करताना सौम्या सरकार ४ धावा काढून रिटायर्ड हर्ट झाला. मात्र अनामूल हक (३७) आणि नजमूल हुसेन शंतो ( नाबाद ५१) यांनी ६९ धावांची भागीदारी करत बांगलादेशचा विजय निश्चित केला. बांगलादेश विजयाच्या उंबरठ्यावर असताना अनामूल हक बाद झाला. अखेर शंतो आणि लिटन दास यांनी आणखी हानी होऊ न देता बांगलादेशच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तीन बळी टिपत न्यूझीलंडच्या आघाडीला खिंडार पाडणाऱ्या तंझीम हसन शाकिबने सामनावीराचा मान पटकवला.