Bangladesh vs New Zealand : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात बांगलादेशच्या संघानं कॅप्टनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दोनशे पारचा आकडा गाठला. पण तगडी फाइट अन् वातावरण टाइट असा काही सीन क्रिएट होईल, एवढी धावसंख्या बांगलादेशला उभारता आली नाही. कर्णधार नजमुल हुसेन शांतोनं केलेली ७७ धावांची खेळी आणि जाकेर अलीनं केलेल्या ४५ धावा वगळता बांगलादेशच्या ताफ्यातील एकालाही मैदानात तग धरता आला नाही. परिणामी बांगलादेश संघाला निर्धारित ५० षटकात ९ बाद २३६ धावांपर्यंतच मजल मारता आली. न्यूझीलंडला हा सामना जिंकून सेमीच तिकीट पक्के करण्यासाठी फक्त २३७ धावांचे टार्गेट मिळाले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बांगलादेश कॅप्टनशिवाय जाकेर अलीनं केली उपयुक्त खेळी
टॉस गमावल्यावर बांगलादेशचा कॅप्टन शांतो आणि तांझिद हसन या जोडीनं संघाच्या डावाची सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी रचली. ब्रेसवेलनं ही जोडी फोडली. त्यानंतर शांतो मैदानात तग धरून उभा राहिला असताना ठराविक अंतराने बांगलादेशनं विकेट गमावल्या. कॅप्टननं ११० चेंडूत ९ चौकाराच्या मदतीने ७७ धावांची खेळी केली. जाकेर अली ४५ (५५), रिशाद हुसेन २६ (२५) आणि तस्किन अहमद १०(२०) यांनी केलेल्या अल्प खेळीच्या जोरावर बांगलादेशच्या संघानं निर्धारित ५० षटकात २३६ धावांपर्यंत मजल मारली.
न्यूझीलंडच्या ताफ्यातून ब्रेसवेलनं दाखवली जादू
न्यूझीलंडच्या ताफ्यातून मायकेल ब्रेसवेल याने १० षटकात २६ धावा खर्च करत ४ विकेट्स घेतल्या. विल ओ'रुर्के याने दोन तर जेमीसन आणि मॅट हेन्री यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. न्यूझीलंडच्या संघाने पाकिस्तान विरुद्धची सलामी लढत जिंकली आहे. दुसरीकडे बांगलादेशच्या संघाने भारताविरुद्धचा पहिला सामना गमावला आहे. बांगलादेशनं दिलेल्या धावांचा यशस्वी पाठलाग करताच न्यूझीलंड सेमीच तिकीट पक्के करेल. जर असं घडलं तर बांगलादेशसह पाकिस्तानचा यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील प्रवास संपुष्टात येईल.