New Zealand tour of Bangladesh : बांगलादेश दौऱ्यावर दुसऱ्या फळीचा संघ पाठवणे न्यूझीलंडला महागात पडले. ऑस्ट्रेलियन संघानं काही दिवसांपूर्वी अशीच चूक केली होती आणि बांगालदेशनं पाच सामन्यांच्या मालिकेत ४-१ असा विजय मिळवला होता. तशीच चूक किवींनी केली आणि त्याची प्रचिती पहिल्याच सामन्यात आली. किवी संघाला संपूर्ण २० षटकंच खेळता आली नाहीत. बांगलादेशनं हा सामना ७ विकेट्सनं जिंकून मालिकेत १-० आघाडी घेतली. बांगलादेशचा हा किवींवरील पहिलाच ट्वेंटी-२० विजय आहे.
आजपासून बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेतील पहिला सामना सुरू झाला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांना खेळपट्टीवर फार काळ टिकता आले नाही. टॉम ब्लंडल ( २), रचिन रवींद्र ( ०), विल यंग ( ५) व कॉलिन डी ग्रँडहोम ( १) हे चार फलंदाज फलकावर ९ धावा असताना माघारी परतले. कर्णधार टॉम लॅथम ( १८) व हेन्री निकोल्स ( १७) यांनी संघर्ष केला. पण त्यांचा संपूर्ण संघ ६० धावांत तंबूत परतला. यापूर्वी २०१४मध्ये श्रीलंकेविरुद्ध किवींचा संघ ६० धावांवर माघारी परतला होता. मुस्ताफिजुर रहमाननं १३ धावांत ३ विकेट्स घेतल्या, तर नसून अहमद, शाकिब अल हसन व मोहम्मद सैफुद्दीन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचे दोन्ही सलामीवीर मोहम्मद नईम ( १) व लिटन दास ( १) हे फलकावर ७ धावा असताना माघारी परतले. पण, अनुभवी शाकिब अल हसन ( २५), मुश्फीकर रहिम ( १६*) व कर्णधार महमदुल्लाह ( १४*) यांनी संघाला विजय मिळवून दिला. बांगलादेशनं १५ षटकांत ३ बाद ६२ धावा करून बाजी मारली.