Join us  

WTC23 Points : न्यूझीलंडविरुद्धचा निकाल महागात पडला, टीम इंडियाला आज पाकिस्तानकडून मोठा धक्का बसला 

BAN vs PAK, 1st Test : पाकिस्तान संघानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दणदणीत विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 11:35 AM

Open in App

BAN vs PAK, 1st Test : पाकिस्तान संघानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील ( ICC world test championship) बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दणदणीत विजय मिळवला. यजमान बांगलादेशनं विजयासाठी ठेवलेलं २०२ धावांचे लक्ष्य पाकिस्ताननं ८ विकेट्स राखून सहज पार केले. पण, पाकिस्तानच्या या विजयाचा टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाला कानपूर कसोटीत हातचा विजय गमवावा लागला आणि न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांनी चिवट खेळ करताना पहिली कसोटी अनिर्णित राखली. त्याचाही फायदा पाकिस्तान संघाला झाला.

बांगलादेशनं पहिल्या डावात ३३० धावा केल्या. मुश्फीकर रहीम व लिटन दास यांनी पाचव्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी करताना ४ बाद ४९ वरून संघाला २५५ धावांपर्यंत पोहोचलवले. लिटन दास २३३ चेंडूंत ११ चौकार व १ षटकारांसह ११४ धावांवर माघारी परतला. रहीम २२५ चेंडूंत ११ चौकारांच्या मदतीनं ९१ धावांवर बाद झाला. प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात केली. अबीद अली व अबदुल्लाह शाफिक यांनी  पहिल्या विकेटसाठई १४६ धावा जोडल्या. अबीदनं २८२ चेंडूंत १२ चौकार व २ षटकारांसह १३३ धावा केल्या, तर शाफिकनं ५२ धावा केल्या. पण, पाकिस्तानचा पहिला डाव २८६ धावांवर गुंडाळून बांगलादेशनं पहिल्या डावात ४४ धावांची आघाडी घेतली. तैजुलनं ११६ धावा देताना ७ विकेट्स  घेतल्या. एबाडोत होसैननं दोन,  तर मेहीदी हसननं एक विकेट घेतली.

बांगलादेशचा दुसरा डाव मात्र गडगडला. लिटन दास ( ५९) व यासीर अली ( ३६) वगळता बांगलादेशच्या फलंदाजांना अपयश आलं. शाहिन शाह आफ्रिदीनं ३२ धावांत ५ विकेट्स घेतल्या , तर साजीद खाननं तीन व हसन अलीनं दोन विकेट्स घेतल्या. बांगलादेशला दुसऱ्या डावात १५७ धावाच करता आल्या. बांगलादेशचं २०२ धावांचे लक्ष्य पाकिस्ताननं सहज पार केलं. अबीद अलीनं ९१ आणि अब्दुल्लाह शफिकनं ७३ धावा केल्या.  या विजयानंतर पाकिस्ताननं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतक्त्यात दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. टीम इंडियाची तिसऱ्या स्थानी घसरण झाली. पाकिस्तानच्या खात्यात २४, तर टीम इंडियाकडे ३० गुण आहेत, परंतु विजयाची सरासरी काढल्यास पाकिस्तान ६६.६६%सह  वरचढ ठरतोय. 

 

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धापाकिस्तानबांगलादेशभारत विरुद्ध न्यूझीलंड
Open in App