Bangladesh vs Pakistan, 1T20I : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीनंतर पाकिस्तानचा संघ बांगलादेश दौऱ्यावर दाखल झाला आहे. पण, येथे पहिल्याच ट्वेंटी-२० सामन्यात यजमान बांगलादेशनं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीत धडक मारणाऱ्या पाकिस्तानची अवस्था वाईट केली आहे. त्याला कुठेतरी जबाबदार अनुभवी फलंदाज शोएब मलिक ( Shoaib Malik) याला धरले जात आहे. संघाला गरज असताना ज्या विचित्र पद्धतीनं तो बाद झाला, यावरून त्याच्यावर टीका सुरू झाली आहे.
प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशला ७ बाद १२७ धावा करता आल्या. अफिफ होसैन ( ३६), महेदी हसन ( ३०) व नुरूल हसन ( २८) यांनी संघासाठी संघर्ष केला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कॅच सोडणारा हसन अली आजच्या सामन्यात चमकला. त्यानं २२ धावांत ३ व विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना मोहम्मद रिझवान ( ११) व बाबर आजम ( ७) ही जबरदस्त जोडी २२ धावांवर माघारी परतली. हैदर अलीही ( ०) लगेच बाद झाला. २ बाद २३ अशी अवस्था असताना अनुभवी शोएब मलिककडून अपेक्षा होत्या. पण, तोही शाळकरी मुलगाही अशी चूक करणार नाही, तशी करून बाद झाला. पाकिस्तानचा निम्मा संघ ८० धावांवर माघारी परतला.
मुस्ताफिजूर रहमाननं टाकलेला चेंडू मलिकच्या बॅटला लागून यष्टिरक्षक नुरूल हसनकडे गेला. तोपर्यंत मलिकनं क्रिज सोडले होते. नुरूलनं त्याला रन आऊट करण्यासाठी चेंडू यष्टिंच्या दिशेनं फेकला, पण मलिक क्रिजवर बॅट टेकवायला विसरला अन् त्याला भोपळ्यावर धावबाद होऊन माघारी जावं लागलं. पाहा व्हिडीओ...