Bangladesh vs South Africa, 2nd Test : दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यातील चट्टोग्राम कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळात एक अजब गजब सीन पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूनंतर बांगलादेशच्या धावफलकावर १० धावा लागल्या होत्या. नो बॉलचा मारा अन् बाइजच्या रुपात असा धावफलक दिसू शकतो. पण इथं मॅटर जरा वेगळा होता.
पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू नो बॉल अन् बाइजचा चौका, तरी ५ धावा ऐवजी दिसला १० चा आकडा
कारण कसोटी जगतातील नंबर वन गोलंदाज असलेल्या कगिसो रबाडाने पहिला चेंडू निर्धाव आणि दुसरा चेंडू नो बॉल टाकल्यावर बाइजच्या रुपात मिळालेल्या ४ धावानंतर हा सीन पाहायला मिळाला होता. मग अवांतर पाच धावा कुठल्या? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना नक्कीच पडू शकतो. कदाचित अनेकांना यात काय रहस्य दडलंय? असाही प्रश्न पडला असेल. जाणून घेऊयात नेमकं असं काय घडलं ज्यामुळे ५ ऐवजी बांगलादेश संघाच्या धावफलकावर १० धावा दिसल्या.
त्यात रहस्य वैगेरे नाही तर नियमाचा होता फॅक्टर
क्रिकेटच्या मैदानात कदाचित पहिल्यांदाच असा धावफलक पाहायला मिळाला. त्यामुळे सोशल मीडियावर यासंदर्भातील व्हिडिओही व्हायरल होताना दिसतोय. पण त्यात रहस्य वैगेरे नव्हतं. तर नियमाचा फायदा बांगलादेशच्या संघाला झाला होता. बांगलादेशच्या संघानं आपल्या डावाची सुरुवात केली त्यावेळी एकही चेंडू न खेळता संघाच्या धावफलकावर ५ धावा जमा झाल्या होत्या. त्याला कारण होत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला देण्यात आलेली पेनल्टी. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू एस मुथुसामी हा खेळपट्टीवर धावताना स्पॉट झाल्यामुळे मैदानातील पंचांनी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पाच धावांची पेनल्टी लावली होती. त्यामुळे बांगलादेशचा संघ मैदानात उतरला त्यावेळी एकही चेंडू न खेळता त्यांना बोनस रुपात पाच धावा मिळाल्या होत्या.
दुसऱ्या सामन्यावर दक्षिण आफ्रिकेची मजबूत पकड
या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघानं ६ बाद ५७५ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. दुसऱ्या दिवसाअखेर बांगलादेशच्या संघाने अवघ्या ३८ धावांत ४ विकेट्स गमावल्या होत्या. यजमान संघ पाहुण्यांच्या तुलनेत अजून ५३७ धावांनी पिछाडीवर आहे. फक्त ६ विकेट्स त्यांच्या हातात आहेत. पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यावरही मजबूत पकड मिळवली आहे.
Web Title: BAN vs RSA 2nd Test Bangladesh Has 10 Runs On Scoreboard After First Ball Of The Inning Know what happened exactly On This Ball Video Goes Viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.