BAN vs SL 3rd T20: बांगलादेशविरूद्धचा तिसरा ट्वेंटी-२० सामना जिंकून श्रीलंकेने तीन सामन्यांची मालिका २-१ अशा फरकाने जिंकली आहे. कुसल मेंडिसची झंझावाती खेळी (५५ चेंडूत ८६ धावा) आणि नुवान तुषाराच्या हॅटट्रिकसह ५ बळींच्या जोरावर श्रीलंकेने विजय साकारला. घातक गोलंदाजीच्या जोरावर तिसऱ्या आणि निर्णायक ट्वेंटी-२० सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशचा पराभव केला. तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ गडी गमावून १७४ धावा केल्या. प्रत्युत्तरात एकेकाळी अवघ्या ३२ धावांत ६ गडी गमावलेला बांगलादेशचा संघ १९.४ षटकांत १४६ धावांत सर्वबाद झाला. अशाप्रकारे श्रीलंकेने मालिका २-१ ने जिंकली आणि बांगलादेशला पराभवाची धूळ चारली. बांगलादेशातील सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्डेडियमवर हा सामना खेळवला गेला.
श्रीलंकेच्या या विजयाचा हिरो ठरला वेगवान गोलंदाज नुवान तुषारा... तुषाराने चार षटकांत केवळ २० धावा देत ५ बळी घेतले. चौथ्या षटकात त्याने हॅटट्रिक घेण्याची किमया साधली. तुषारा आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. त्याला मुंबई इंडियन्सने लिलावात ४.८ कोटी रुपयांत खरेदी केले. प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही. धनंजय डी सिल्वा (८) आणि कामिंदू मेंडिस (१२) धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. मात्र, दुसऱ्या टोकाकडून कुसल मेंडिसने मोर्चा सांभाळला. कर्णधार वानिंदू हसरंगा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला, पण तोही जास्त वेळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही.
श्रीलंकेची फायनलमध्ये बाजी मग हसरंगाने १३ चेंडूत १ चौकार आणि १ षटकारासह १५ धावा केल्या. त्यानंतर असलंका (३) आणि अँजेलो मॅथ्यूज (१०) हेही स्वस्तात बाद झाले. १११ धावांत दोन गडी गमावलेल्या श्रीलंकेने १४२ धावांवर पाच गडी गमावले. बांगलादेशने शेवटच्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी केली. मेंडिस ५५ चेंडूत ८६ धावा करून बाद झाला. त्याने ६ चौकार आणि तितकेच षटकार मारले. श्रीलंकेने निर्धारित २० षटकांत ७ बाद १७४ धावा केल्या.
श्रीलंकेने दिलेल्या १७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बांगलादेशचा संघ सुरुवातीलाच अडचणीत आला. धनंजय डी सिल्वाने लिटन दासला बाद करत संघाला पहिला धक्का दिला. यानंतर नुवान तुषाराने सलग तीन चेंडूंवर कर्णधार नजमुल हुसैन शांतो, तौहीद हरदोय आणि माबमहुदुल्ला यांना बाद केले. यानंतर तुषाराने सौम्या सरकारलाही ११ धावांवर बाद करत बाहेरचा रस्ता दाखवला. बांगलादेशने अवघ्या ३२ धावांत ६ गडी गमावले. अशातच रिशाद हुसेनने ३० चेंडूत सात षटकारांच्या मदतीने ५३ धावा करत बांगलादेशच्या चाहत्यांना जागे केले. तस्किन अहमदने ३१ धावा करून प्रतिस्पर्धी संघाला आव्हान दिले पण तो बांगलादेशला विजय मिळवून देऊ शकला नाही. अखेर बांगलादेशचा संघ १९.४ षटकांत १४६ धावांवर सर्वबाद झाला आणि सामना २८ धावांनी गमावला.