नवी दिल्ली : श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर सामना खेळवला जात आहे. खरं तर श्रीलंकेचा अनुभवी खेळाडू अँजेलो मॅथ्यूजला एका वादग्रस्त निर्णयामुळे विकेट गमवावी लागली अन् सामना चर्चेत आला. बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसनने पंचांकडे अपील करताच मॅथ्यूज विरूद्ध शाकीब असा सामना सुरू झाला. लक्षणीय बाब म्हणजे मॅथ्यूज निर्धारित वेळेत फलंदाजीसाठी तयार न झाल्याने त्याला बाद घोषित करण्यात आले. या घटनेचे पडसाद दुसऱ्या डावात देखील पाहायला मिळाले. योगायोग असा की मॅथ्यूजनेच शाकीबला बाद केले अन् मग घड्याळ दाखवत बाहेर जाण्याचा इशारा केला. चांगल्या लयनुसार खेळत असलेल्या शाकीबला मॅथ्यूजने ८२ धावांवर असताना बाद केले अन् बांगलादेशला तिसरा झटका दिला. याच षटकांत बांगलादेशला आणखी एक धक्का देताना मॅथ्यूजने सेट फलंदाज नझमुल हुसैन शांतोला (९०) बाहेरचा रस्ता दाखवला.
तत्पुर्वी, चरिथ असलंकाच्या शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने मजबूत धावसंख्या उभारली. पथुम निसांकाने ३६ चेंडूत ४१ धावांची खेळी करून श्रीलंकेला चांगली सुरूवात करून दिली होती. त्यानंतर बांगलादेशने पुनरागमन करताना श्रीलंकेच्या कुसल परेरा (४) आणि कुसल मेडिंस (१९) यांना स्वस्तात माघारी पाठवले. त्यानंतर सदीरा समरविक्रमाने (४१) धावांची सावध खेळी करून लंकेचा डाव पुढे नेला. मग असलंकाने १०५ चेंडूत १०८ धावांची अप्रतिम खेळी करून बांगलादेशसमोर सन्मानजनक आव्हान उभारण्यात मोलाची भूमिका बजावली. श्रीलंकेने ४९.३ षटकांत सर्वबाद २७९ धावा करून बांगलादेशला विजयासाठी २८० धावांचे लक्ष्य दिले.
मॅथ्यूजच्या विकेटवरून वादश्रीलंकेचा अनुभवी खेळाडू अँजेलो मॅथ्यूजला एका वादग्रस्त निर्णयामुळे विकेट गमवावी लागली. टाईम आऊटमुळे मॅथ्यूजला बाहेरचा रस्ता धरावा लागला अन् वाद चिघळला. मॅथ्यूज आणि बांगलादेशी खेळाडूंमध्ये बाचाबाची देखील झाली. याशिवाय पॅव्हेलियनमध्ये परतत असताना श्रीलंकन खेळाडूने हेल्मेट फेकून दिले. खरं तर फलंदाज बाद झाल्यानंतर दुसऱ्या फलंदाजाला तीन मिनिटांच्या आत खेळपट्टीवर पोहोचावे लागते. मॅथ्यूज मैदानात पोहोचला परंतु निर्धारित वेळेत चेंडूचा सामना करू शकला नाही. अशा स्थितीत बांगलादेशच्या कर्णधाराने 'टाईम आऊट'चा दाखला देत विकेटसाठी अपील केली, ज्यावर पंचांनी बांगलादेशच्या बाजूने निर्णय दिला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईम आउटवर बाद होणारा मॅथ्यूज जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. मॅथ्यूजच्या विकेटचा परिणाम दुसऱ्या डावात देखील पाहायला मिळाला अन् पंचांना मध्यस्थी करावी लागली.
आजच्या सामन्यासाठी बांगलादेशचा संघ -शाकीब अल हसन (कर्णधार), तंजीद हसन, लिटन दास, नझमुल हुसैन शांतो, मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह, तौहीद हृदोय, मेहदी हसन मिराज, तन्झीम हसन शाकिब, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम.
आजच्या सामन्यासाठी श्रीलंकेचा संघ - कुसल मेंडिस (कर्णधार), पाथुम निसांका, कुसल परेरा, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजय डी सिल्वा, महिश तीक्ष्णा, दुष्मंथा चमीरा, कसून राजिथा, दिलशान मदुशंका.