Asitha Fernando, BAN vs SL WTC23: मिरपूर येथे बांगलादेश विरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत पाहुण्या श्रीलंकेने यजमानांना पराभूत केले आणि १-० ने मालिका जिंकली. बांगलादेशने पहिल्या डावात साडेतीनशे (३६५) पार मजल मारल्यानंतर श्रीलंकेने प्रत्यु्त्तरात धावसंख्या पाचशेपार (५०६) पोहोचवली. त्यानंतर दुसऱ्या डावात असिथा फर्नांडोच्या भेदक माऱ्यापुढे बांगलादेशी फलंदाजांनी गुडघे टेकवले आणि त्यांचा डाव १६९ धावांत आटोपला. त्यानंतर विजयासाठी आवश्यक २९ धावा करत श्रीलंकेने सामन्यासह मालिका खिशात घातली. असिथा फर्नांडोने सामन्यात १० बळी घेत सामनावीराचा मान पटकावला. तसेच, केवळ दुसऱ्यांदा परदेशातील कसोटीत श्रीलंकेच्या गोलंदाजाने सामन्यात १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.
पहिल्या डावात बांगलादेश कडून मुश्फीकूर रहीमने नाबाद १७५ आणि लिटन दासने १४१ धावा करत संघाला ३६५ धावांपर्यंत पोहोचवले. त्या डावात फर्नांडोने ४ तर रंजिथाने ५ बळी टिपले. प्रत्युत्तरात अँजेलो मॅथ्यूजच्या नाबाद १४५ धावा, दिनेश चंडीमलच्या १२४ धावा आणि दिमुथ करूणरत्नेच्या ८० धावांच्या जोरावर श्रीलंकेने ५०६ धावा केल्या. शाकीब अल हसनने ५ तर इबादत होसेनने ४ गडी माघारी धाडले. दुसऱ्या डावातही तगडी फटकेबाजी पाहायला मिळणार अशी चाहत्यांची अपेक्षा होती, पण तसं घडलं नाही.
दुसऱ्या डावात बांगलादेशचा डाव गडबडला. असिथा फर्नांडोने १७.३ षटकांत ५१ धावा देऊन ६ बळी घेतले. त्याला रंजिथाने साथ दिली आणि २ गड्यांना माघारी पाठवले. अनुभवी शाकिब अल हसनने ५८ धावांची खेळी केली. पहिल्या डावात दीडशतक हुकलेल्या लिटन दासने दुसऱ्या डावात अतिशय संथ खेळी केलीय त्याने १३५ धावांमध्ये ५२ धावा केल्या. अखेर श्रीलंकेला विजयासाठी केवळ २९ धावांचे आव्हान मिळाले. ओशादा फर्नांडोने ९ चेंडूत नाबाद २१ धावा कुटत संघाला विजय मिळवून दिला.
विश्व कसोटी अजिंक्यपद २०२३ - श्रीलंका टॉप-२ मध्ये!
दरम्यान, या विजयासह श्रीलंकेने १२ गुणांची कमाई करत विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत (World Test Championship) दुसरा क्रमांक (६० गुण) पटकावला. त्यांनी पाकिस्तानला खाली ढकलत टॉप-२ मध्ये स्थान मिळवलं. या यादीत ऑस्ट्रेलियन संघ ७२ गुणांसह अव्वल आहे.