BAN-W vs IND-W 2023 : सध्या भारतीय महिला संघ बांगलादेशविरूद्ध वन डे मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून यजमान बांगलादेशच्या संघाने विजयी सलामी दिली आहे. आज दुसरा सामना खेळवला जात असून सामन्याच्या मध्यालाच टीम इंडियाला मोठा झटका बसला. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या दुखापतीमुळे भारतीय संघाची डोकेदुखी वाढली आहे. आजचा सामना जिंकून मालिका आपल्या खिशात घालण्यासाठी यजमान संघ प्रयत्नशील आहे. तर बांगलादेशचा पराभव करून मालिकेत बरोबरी साधण्याचे आव्हान भारतासमोर आहे.
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने जेमिमा रॉड्रिग्जच्या ८६ आणि हरमनप्रीत कौरच्या ५२ धावांच्या जोरावर ८ बाद २२८ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. मात्र, भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरला डाव्या हाताच्या दुखापतीमुळे सामन्यातून माघार घ्यावी लागली.
हरमनचे अर्धशतक हरलीन देओल बाद झाल्यानंतर हरमनप्रीत कौर मैदानात आली आणि तिने आपले अर्धशतक पूर्ण केले, मात्र तिला काही वेळातच दुखापतीमुळे मैदानातून परतावे लागले. दरम्यान, बांगलादेशकडून नाहिदा अख्तरने १० षटकांत ३७ धावा देत दोन बळी घेतले. भारतीय फलंदाजांनी सांघिक खेळी करून यजमान संघासमोर २२९ धावांचे सन्मानजनक आव्हान ठेवले.
हरमनच्या दुखापतीनं वाढली डोकेदुखी भारताच्या डावातील ३६व्या षटकांत हरमनप्रीत कौरने एक धाव काढून अर्धशतक पूर्ण केले. अशातच अचानक क्षेत्ररक्षकाचा एक थ्रो तिच्या डाव्या हाताला लागला. त्यानंतर टीम फिजिओ वैद्यकीय मदतीसाठी मैदानात दाखल झाले. प्राथमिक उपचारानंतर भारतीय कर्णधाराने पुन्हा फलंदाजी सुरू केली असली तरी काही चेंडूंनंतरच तिला असह्य वेदना जाणवू लागल्याने भारतीय कर्णधाराला मैदानाबाहेर जावे लागले. हरमनच्या गैरहजेरीत स्मृती मानधना भारतीय संघाची धुरा सांभाळत आहे.