नवी दिल्ली : चंदीगडमध्ये झालेल्या एका टी-२० सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात येऊन सामना श्रीलंकेत खेळला गेल्याचे भासवण्यात आले. बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी युनिटने (एसीयू) पंजाब पोलीस तसेच श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या मदतीने याचा तपास सुरू केला आहे. लंका बोर्डाने यात सहभाग असल्याचा इन्कार करीत कायदेशीर कारवाईचा निर्णय घेतला.
‘इंडियन एक्स्प्रेस’ने शुक्रवार प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार २९ जून रोजी चंदीगडपासून १६ किलोमीटर दूर असलेल्या सवारा गावात हा सामना खेळविण्यात आला. तथापि याचे लाईव्ह स्ट्रीमिंग मात्र श्रीलंकेच्या बादूला शहरात दाखविण्यात आले. बादूला शहरात युवा टी-२० लीगचे आयोजन युवा प्रांतीय क्रिकेट संघातर्फे स्थानिक मैदानावर करण्यात येते.
पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात सट्टेबाजांचा सहभाग तर नाही ना, याचा शोध घेण्यात येत आहे. दुसरीकडे या प्रकरणात नेमके कोण-कोण सामील आहेत, हे जाणून घेण्यावर बीसीसीआयची नजर आहे. श्रीलंका बोर्डाने अशाप्रकारच्या सामन्याचे आयोजन झाल्याची कुठलीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले.
बीसीसीआयचे एसीयू प्रमुख अजितसिंग यांनी सांगितले की यात कुणाचे डोके आहे, हे पोलीस शोधून काढतीलच. आमच्याकडे माहिती आल्यास आम्ही निश्चितपणे उघड करू. आरोपींवर कारवाई करण्याचे अधिकार केवळ पोलिसांकडे आहेत. बीसीसीआयशी मान्यताप्राप्त लीग असती किंवा यात आमच्या खेळाडूंचा सहभाग असता तर आम्ही कारवाई केली असती. सट्टेबाजीसाठी हे कृत्य केले असेल तर तो गुन्हा आहे. यावर कारवाई करणे पोलिसांच्या अधिकार कक्षेत येते.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने या प्रकरणी हात वर केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, भारताच्या एका वेबसाईटने २९ जून रोजी जो धावफलक दाखवला तो सामना युवा प्रीमियर लीग टी-२० चा असून बादूला स्टेडियमवर खेळवल्याचे दिसत आहे. मात्र अशाप्रकारची कुठलीही स्पर्धा श्रीलंकेत झालेली नाही हे आम्ही स्पष्ट करू इच्छितो. श्रीलंकेतील युवा प्रांतीय क्रिकेट संघाचे सहायक सचिव भागीधरन बालाचंद्रन म्हणाले, ‘कुणी डोके वापरून हे काम केले असावे. आमची संस्था इतकी सक्रिय नाही. आमच्या संघाने अशा कुठल्याही स्पर्धेस परवानगी बहाल केली नाही. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाला सहकार्य करीत आहोत.’ मोहालीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक कुलदीपसिंग चहल यांनीदेखील या प्रकरणाचा वेगवान तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले. श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे सीईओ अॅश्ले डिसिल्व्हा म्हणाले, ‘हे प्रकरण एसीयूकडे सोपविण्यात आले आहे. आम्ही अशा कुठल्याही स्पर्धेला मंजुरी दिलेली नाही. अशा घटना रोखण्यासाठी योग्य कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.उपअधीक्षक केपी सिंग म्हणाले, ‘आम्हाला सामन्याबाबत आॅनलाईन तक्रार प्राप्त झाली. या संदर्भात गुरुवारी रात्री पंकज जैन आणि राजू नावाच्या दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे.’