जसप्रीत बुमराहचा भेदक 'चौका' आणि त्याला मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि जडेजाने प्रत्येकी २-२ विकेट्स घेत दिलेली साथ याच्या जोरावर भारतीय संघाने बांगलादेशचा पहिल्या डावातील खेळ फक्त १४९ धावांवर खल्लास केला. भारतीय संघाने पहिल्या डावात तब्बल २२७ धावांची आघाडी घेत सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे.
बांगलादेशची खराब सुरुवात
भारतीय संघाला पहिल्या डावात ३७६ धावांवर रोखल्यावर बांगलादेशच्या संघाची सुरुवात खराब झाली. बुमराहनं पहिल्याच षटकातील अखेरच्या चेंडूवर सलामी जोडी फोडली. अवघ्या दोन धावांवर बांगलादेशच्या संघाला पहिला धक्का बसला होता. त्यानंतर आकाश दीप पिक्चरमध्ये आला त्याने नवव्या षटकात एकापाठोपाठ एक अशा दोन विकेट्स घेत बांगलादेशची अवस्था २ बाद २२ अशी केली.
एक जोडी जमली, ती जड्डूनं फोडली
आघाडीच्या पाच फलंदाजांमध्ये कर्णधार शाँतोच्या २० धावा सोडल्या तर एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. धावफलकावर ४० धावा असताना बांगलादेशचा अर्धा संघ तंबूत परतला होता. मग लिटन दास आणि शाकिब अल हसन या दोघांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या जोडीनं ५१ धावांची भागीदारी केली. ही जोडी सेट झालीये असं वाटत असताना जड्डूनं ही जोडी फोडली. आधी त्याने लिटन दासला आपल्या जाळ्यात अडकवलं. मग शाकिबही त्याच्या सापळ्यात अडकला. शाकिबनं ६४ चेंडूत केलेली ३२ धावांची खेळी बांगलादेशकडून कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वोच्च खेळी ठरली. त्याच्याशिवाय लिटन दास याने ४२ चेंडूत २२ आणि मेहंदी हसन मिराझ याने ५२ चेंडूत ५७ धावा केल्या.
पहिल्या डावात अश्विनच्या खात्यात आली नाही विकेट
भारताकडून जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याने ११ षटके टाकली यात एका निर्धाव षटकासह त्याने ५० धावा खर्च केल्या. आकाश दीप याने ५ षटकांत १९ धावा खर्च करून २ विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय मोहम्मद सिराज आणि जड्डूनं प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. आर अश्विन याने १३ षटके गोलंदाजी केली. पण त्याला पहिल्या डावात एकही विकेट मिळाली नाही.