बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसन याला फेसबुक लाईव्ह सुरू असताना कट्टरपंथीकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. शाहपूर तालुकदार येथे राहणाऱ्या मोहसीन तालुकदार यानं रविवारी १२.०६ वाजता फेसबुक लाईव्ह केले आणि त्यात त्यानं शकिब याचे वागणे मुस्लीमांच्या भावना दुखावणारे आहे, असा दावा केला. त्यानंतर या व्यक्तीनं क्रिकेटपटूचे तुकडेतुकडे करण्याची धमकी दिली. गरज पडल्यास त्यासाठी सिलहेट ते ढाका चालत येण्याची तयारीही त्यानं दर्शवली. कोलकाता येथे शकिबनं काली पूजा केल्यामुळे त्यानं ही धमकी दिली आहे.
सिलहेट पोलिस चौकीचे अतिरिक्त उपायुक्त बी.एम.अश्रफ उल्लाह ताहेर यांनी सांगितले की,''आम्ही या व्हिडीओची लिंक सायबर फॉरेन्सिक टीमकडे पाठली आहे. लवकरच कायदेशीर कारवाई केली जाईल.'' पण, या युवकानं नंतर पुन्हा फेसबुक लाईव्ह करून शकिबची माफी मागितली. शिवाय त्यानं शकिबसह अन्य सेलेब्रिटींना योग्य मार्गावर चालण्याचा सल्लाही दिला. उल्लाह ताहेर यांनी सांगितले की, हे व्हिडीओ समाजात तेढ निर्माण करणारे आहेत आणि त्यामुळे ते फेसबुकवरून हटवण्यात आले आहेत.
गुरुवारी शकिब बेलेघाटा येथे काली पूजा करण्यासाठी गेला होता. त्यावेळी तो देवीसमोर प्रार्थना करताना दिसला होता. शुक्रवारी तो बांगलादेशमध्ये परत आला. शकिबला आयसीसीच्या अँटी करप्शन विभागानं दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा सुनावली होती आणि २९ नोव्हेंबरला ती शिक्षा पूर्ण झाली. शकिब आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. शकिबनं ५६ कसोटींत ३८६२ धावा आणि २१० विकेट्स घेतल्या आहेत. त्याशिवाय त्यानं २०६ वन डे व ७६ ट्वेंटी-20 सामन्यांत अनुक्रमे ६३२३ धावा व २६० विकेट्स आणि १५६७ धावा व ९२ विकेट्स घेतल्या आहेत.