ढाका - एका महिला क्रिकेटरला 14000 ड्रग्जच्या गोळ्यासह पकडण्यात आल्यामुळं क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे. जियो टीवीच्या वृत्तानुसार बांगलादेशची महिला क्रिकेटर नाजरीन खान मुक्ता हिला पोलिसांनी ड्रग्जच्या गोळ्यासह पकडले आहे. नाजरीन खान मुक्ताला जन्मठेपेची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नाजरीन खान मुक्ता बांगलादेशची आघाडीची खेळाडू आहे. ढाका प्रीमियर लीगमध्ये सध्या खेळत आहे. पोलिस आधिकारी प्रोनब चौधरींनी दिलेल्या माहितीनुसार, नाजरीन खान मुक्ता सामना खेळून माघारी परतत असताना चित्तागोंगमध्ये पोलिसांनी बसची तपासणी केली. या तपासणी दरम्यान नाजरीन खान मुक्ताच्या बॅगमध्ये ड्रग्जच्या 14 हजार गोळ्या मिळाल्या. या गोळ्या मॅथमपेटामिन आणि कॅफीनपासून तयार करण्यात आलेल्या आहेत. बांगलादेशमध्ये याला याबा गोळ्या असे म्हणतात.
बॅगेत आढळलेल्या गोळ्यामुळं नाजरीन खान मुक्ताला क्रिकेट खेळण्यास अजीवन बंदीतर घातली जाऊ शकते. त्याशिवाय तिला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते आशी शक्यता पोलिस आधिकारी प्रोनब चौधरींनी व्यक्त केली. ऑगस्ट 2017 नंतर चित्तागोंगमध्ये ड्रग्जच्या गोळ्या तयार करण्याचे कारखाने वाढले आहेत. गेल्या तीन महिन्यात 90 लाख गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पोलिसांनी दिली.