Shakib Al Hasan ruled out | नवी दिल्ली : बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसन वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सोमवारी झालेला बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामना अनेक नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत राहिला. शाकीबने अँजेलो मॅथ्यूजला 'टाईम आऊट'मुळे बाहेरचा रस्ता दाखवला अन् वाद चिघळला. दुसऱ्या डावात मॅथ्यूजने देखील बांगलादेशच्या कर्णधाराला बाद करून 'घड्याळ' दाखवले आणि बाहेर जाण्याचा इशारा केला. पण, यंदाच्या विश्वचषकातील आपल्या अखेरच्या सामन्याला शाकीब अल हसन मुकणार आहे. डाव्या हाताच्या बोटाला झालेल्या दुखापतीमुळे बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसन उर्वरित विश्वचषकातून बाहेर झाला आहे.
बांगलादेशच्या संघाचे फिजिओ बेजेदुल इस्लाम खान यांनी शाकीबच्या दुखापतीबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, शाकीबला श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यादरम्यान दुसऱ्या डावात डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. पण, त्याने सपोर्टिव्ह टेपिंग आणि पेनकिलरसह फलंदाजी सुरू ठेवली. सामन्यानंतर त्याचा दिल्लीत इमर्जन्सी एक्स-रे काढण्यात आला, ज्यामध्ये बोटाच्या जॉइंटवर फ्रॅक्चर झाल्याचे आढळून आले. दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला तीन ते चार आठवडे लागतील असा अंदाज आहे. त्यामुळे तो आज बांगलादेशला रवाना होणार आहे.
मॅथ्यूजच्या विकेटवरून वादसोमवारी दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर झालेल्या बांगलादेश आणि श्रीलंका या सामन्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. श्रीलंकेचा अनुभवी खेळाडू अँजेलो मॅथ्यूजला एका वादग्रस्त निर्णयामुळे विकेट गमवावी लागली. टाईम आऊटमुळे मॅथ्यूजला बाहेरचा रस्ता धरावा लागला अन् वाद चिघळला. मॅथ्यूज आणि बांगलादेशी खेळाडूंमध्ये बाचाबाची देखील झाली. याशिवाय पॅव्हेलियनमध्ये परतत असताना श्रीलंकन खेळाडूने हेल्मेट फेकून दिले. खरं तर फलंदाज बाद झाल्यानंतर दुसऱ्या फलंदाजाला तीन मिनिटांच्या आत खेळपट्टीवर पोहोचावे लागते. मॅथ्यूज मैदानात पोहोचला परंतु निर्धारित वेळेत चेंडूचा सामना करू शकला नाही. अशा स्थितीत बांगलादेशच्या कर्णधाराने 'टाईम आऊट'चा दाखला देत विकेटसाठी अपील केली, ज्यावर पंचांनी बांगलादेशच्या बाजूने निर्णय दिला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईम आउटवर बाद होणारा मॅथ्यूज जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. मॅथ्यूजच्या विकेटचा परिणाम दुसऱ्या डावात देखील पाहायला मिळाला अन् पंचांना मध्यस्थी करावी लागली.