Bangladesh vs England 2nd T20: एकीकडे भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात चुरशीचा कसोटी सामना सुरू असताना, दुसरीकडे बांगलादेशच्या संघाने टी२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला. टी२० क्रिकेटचे विश्वविजेते असलेल्या इंग्लंडच्या संघाचा बांगलादेशने दुसऱ्या टी२० मध्ये पराभव केला आणि टी२० मालिकेत २-० अशी अजिंक्य आघाडी घेतली. बांगलादेशच्या संघाने प्रथम गोलंदाज करताना इंग्लंडच्या तगड्या संघाला २० षटकात केवळ ११७ धावाच करू दिल्या. मेहदी हसन मिराजने १२ धावांत ४ बळी घेतले. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करताना, बांगलादेशच्या हे आव्हान एक षटक राखून पूर्ण केलं आणि पहिल्यांदा इंग्लंडला मालिकेत पराभूत केले.
इंग्लंडच्या संघाने पहिला सामना गमावल्याने, आजचा सामना जिंकून बरोबरी साधण्याचा त्यांचा मानस होता. पण तसे होऊ शकले नाही. इंग्लंडच्या संघाने प्रथम फलंदाजी केली. पण त्यांच्या फलंदाजांना म्हणावी तशी फटकेबाजी करताच आली नाही. बेन डकेटने सर्वाधिक २८ धावा केल्या. त्यासाठी त्याला २८ चेंडू खेळून काढावे लागले. फिल सॉल्टने थोडीशी फटकेबाजी करण्याचा मानस दाखवला होता, पण तो १९ चेंडूत २५ धावा काढून बाद झाला. त्यानंतर मोईन अलीने १५ धावा काढून संघाला ११७ पर्यंत नेले. मेहदी हसनने फलंदाजांना बांधून ठेवत ४ षटकात १२ धावांत ४ बळी टिपले.
बांगलादेशच्या संघालाही हे आव्हान सहज पेलवले नाही. ११८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध कामगिरी केली. दोन्ही सलामीवीर एकेरी धावसंख्येवर बाद झाले. नजीमुल होसेनने एक बाजू लावून धरली आणि ४७ चेंडूत नाबाद ४६ धावा केल्या. बाकी फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. पण तरीही नजिमुलने शेवटपर्यंत टिकून संघाला सामना आणि मालिका विजय मिळवून दिला.