आरक्षणाविरोधात झालेलं हिंसक आंदोलन आणि झालेल्या सत्तांतरानंतर आता बांगलादेशमध्ये काळजीवाहू सरकार स्थापन झालं आहे. मात्र तरीही येथील परिस्थिती अद्याप पूर्वपदावर आलेली नाही. बांगलादेशमध्ये घडत असलेल्या या घडामोडींदरम्यान, बांगलादेश क्रिकेट संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाकिब अल हसन हा अडचणीत सापडला आहे. शाकिबविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांगलादेशमधील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार देशात झालेल्या आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या रुबेल नावाच्या तरुणाचे वडील रफिकूल इस्लाम यांनी गुरुवारी ढाका येथील पोलीस ठाण्यात शाकिब अल हसनविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कामगार असलेल्या रुबेल याचा आंदोलनादरम्यान मृत्यू झाला होता.
शाकिब अल हसनबरोबरच अभिनेता फिरदोस अहमद याच्याविरोधातही हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये शाकिब हा २८ वा तर फिरदोस हा ५५ वा आरोपी आहे. या प्रकरणातील इतर आरोपींमध्ये माजी पंतप्रधान शेख हसिना यांच्यासह ओबेदूल कादर आणि इतर १५४ जणांचा समावेश आहे. याशिवाय सुमारे ४०० ते ५०० अज्ञात लोकांनाही आरोपी बनवण्यात आले आहे.
रुबेल याने एडबोर येथे रिंग रोडवर झालेल्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. या आंदोलनादरम्यान, जमावावर नियोजनबद्धरीत्या गोळीबार झाला होता. त्यादकरम्यान रुबेल हासुद्धा छाती आणि पोटात गोळ्या लागल्याने गंभीर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात नेण्यात आले मात्र तिथे त्याचा ७ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला.
शाकिब अल हसन आणि फिरदोस अहमद हे जानेवारी महिन्यात झालेल्या निवडणुकीत अवामी लीग पक्षाच्या तिकिटावर निवडून आले होते. दरम्यान, शेख हसिना यांचं सरकार सत्तेतून बाहेर पडल्याने त्याचंही सदस्यत्व गेलं होतं. शाकिब अल हसन सध्या पाकिस्तानमध्ये असून, तिथे तो पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळत आहे.