Join us  

हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं

शाकिब अल हसनवर हत्येचा आरोप झाला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 12:25 PM

Open in App

shakib al hasan news : बांगलादेशचा दिग्गज अष्टपैलू शाकिब अल हसन याच्याविरुद्ध देशात सुरू असलेल्या विरोधामुळे बोर्ड त्याला वैयक्तिक सुरक्षेची हमी देऊ शकत नाही,' असे बांगलादेश क्रिकेट बोर्डचे (BCB) अध्यक्ष फारुक अहमद यांनी स्पष्ट केले. 'मायदेशी परतल्यानंतर माझ्या सुरक्षेची काळजी घेतल्यास मी ऑक्टोबरमध्ये मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरची कसोटी लढत खेळेन,' असे शाकिबने म्हटले होते. मात्र, बीसीबीने आपली बाजू स्पष्ट केल्याने शाकिबच्या अडचणीत भर पडली आहे.

नुकतीच शाकिब अल हसनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. शाकिबने सांगितले की, त्याची शेवटची कसोटी मीरपूर येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शाकिबला काही खास कामगिरी करता आली नाही. बांगलादेशच्या या अनुभवी खेळाडूने पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात ३२ आणि दुसऱ्या डावात अवघ्या २५ धावा केल्या. याशिवाय या सामन्यात त्याला एकही बळी घेता आला नाही.

बांगलादेशचा हा स्टार अष्टपैलू खेळाडू मैदानावर आणि मैदानाबाहेर वादांमुळे चर्चेत असतो. या वर्षी एप्रिलमध्ये त्याची ग्राउंड स्टाफसोबत बाचाबाची झाली होती. त्याचा फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आणि मारहाण करण्याची धमकीही दिली होती. याशिवाय तो मैदानावर विरोधी संघातील खेळाडू आणि पंचांशीही अनेकदा भांडला आहे. वन डे विश्वचषक २०२३ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शाकिबचा अँजेलो मॅथ्यूजसोबत वाद झाला होता. बांगलादेशातील सत्तापालटानंतर शाकिब अल हसनवर हत्येचा आरोप झाला होता, त्यामुळे तो आपल्या देशात परतला नाही. 

टॅग्स :बांगलादेशऑफ द फिल्ड