Bangladesh creates history, T20I Cricket: क्रिकेटच्या जगात काहीही होऊ शकते. लहान संघ मोठ्या संघाला पराभूत करू शकतो. मोठा विजय मिळवूनही संघ इतिहासात आपले नाव नोंदवण्यास चुकू शकतो, तर काही वेळा किरकोळ विजयही इतिहास घडवू शकतो. बांगलादेश संघानेही काल तेच केले. बांगलादेश संघाने अवघ्या 7 धावांच्या किरकोळ फरकाने विजय मिळवला. पण त्याची क्रिकेटचा इतिहासात नोंद झाली. बांगलादेशने जे केले, ते ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारतासारख्या बड्या-बड्या संघांनाही आजपर्यंत कधीच करता आलेले नाही.
बांगलादेशच्या संघाने असं केलं तरी काय...
बांगलादेशच्या पुरुष आणि महिला संघाने एकाच दिवशी अतिशय आश्चर्यकारक अशी कामगिरी केली. दोघांनीही एकाच शैलीत सामना जिंकला, पण मैदान आणि विरोधी संघात फरक होता. पुरुष आणि महिला अशा दोन्ही सामन्यांमध्ये एकाच दिवशी समान फरकाने आंतरराष्ट्रीय T20 सामना जिंकणारा बांगलादेश हा पहिला संघ ठरला आहे. पुरुष संघाने यूएईचा ७ धावांनी पराभव केला, तर महिला संघाने त्याच फरकाने आयर्लंडचा पराभव केला. या विजयातील विशेष बाब म्हणजे दोन्ही संघांनी युएईमध्येच हा कारनामा केला.
दुबईत खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या T20 सामन्यात पुरुष संघाने UAE चा पराभव केला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने निर्धारित षटकात ५ गडी गमावून १५८ धावा केल्या. प्रत्युत्तरात यूएईचा संघ १९.४ षटकांत १५१ धावांवर बाद झाला. बांगलादेशकडून अफिफ होसेनने सर्वाधिक ७७ धावा केल्या. त्याने ५५ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकार लगावले.
दुसरीकडे महिला संघाने ICC T20 विश्वचषक पात्रता स्पर्धा जिंकली आहे. अंतिम फेरीत त्यांनी आयर्लंडचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने ८ विकेट गमावत १२० धावा केल्या. प्रत्युत्तरात आयर्लंडचा महिला संघ निर्धारित षटकात ९ गडी गमावून ११३ धावाच करू शकला. बांगलादेश महिला संघाकडून फरगना हिने सर्वाधिक ६१ धावा केल्या. तिनेही ५५ चेंडूत खेळत ७ चौकार मारले.
Web Title: Bangladesh Cricket team creates history in T20 Internationals 1st team to win men and women match by same margin on same day
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.