Join us  

Bangladesh Politics : बांगलादेशचा क्रिकेटपटू शाकिबची राजकारणात एन्ट्री; लवकरच निवडणुकीच्या मैदानात

Bangladesh Shakib Al Hasan In Politics : क्रिकेटच्या मैदानावर भल्याभल्यांना भिडणारा शाकिब आता राजकीय मैदानात दिसणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 12:00 PM

Open in App

Shakib Al Hasan May Contest 2024 Election : तापट स्वभाव आणि आक्रमक शैलीमुळे प्रसिद्ध असलेला बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन नवीन खेळी सुरू करणार असल्याचे कळते. क्रिकेटच्या मैदानावर भल्याभल्यांना भिडणारा शाकिब आता राजकीय मैदानात दिसणार आहे. त्याने अधिकृतपणे राजकारणात पाऊल ठेवले असून ७ जानेवारीपासून होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी बांगलादेश अवामी लीगकडून उमेदवारी मागितली आहे. बांगलादेश अवामी लीगचे संयुक्त सरचिटणीस बहाउद्दीन नसीम यांनी सांगितले की, शाकिबने शनिवारी तीन मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज घेतले आहेत.

शाकिबची नवीन खेळी

बांगलादेशी क्रिकेटपटूचा राजकारणात प्रवेश झाल्याने प्रमुख विरोधी पक्षांकडून निवडणुकीवर बहिष्कार टाकला जाण्याची शक्यता आहे. बहाउद्दीन नसीम यांनी शाकिबचे राजकारणात स्वागत करताना म्हटले, "तो एक सेलिब्रिटी आहे आणि देशातील तरुणांमध्ये त्याची प्रचंड लोकप्रियता आहे." पंतप्रधान शेख हसीना यांच्या अध्यक्षतेखालील सत्ताधारी पक्षाच्या संसदीय मंडळाने शाकिबच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार आहे. 

तसेच शाकिब अल हसन त्याच्या दक्षिण-पश्चिम गृह जिल्हा मागुरा किंवा राजधानी ढाका येथील जागेवरून निवडणूक लढवू शकतो, असेही बांगलादेश अवामी लीगचे संयुक्त सरचिटणीस नसीम यांनी सांगितले. सध्या बांगलादेशचे पंतप्रधानपद शेख हसीना यांच्या हाती आहे. खरं तर यावेळीही विरोधी पक्षांचा बहिष्कार कायम राहिल्यास चौथ्यांदा त्या सत्तेत परतणार हे जवळपास निश्चित आहे. हसीना यांनी देशाची आर्थिक स्थिती मजबूत व्हावी यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले, परंतु पाश्चात्य देशांनी लोकशाही व्यवस्थेच्या घसरणीबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. विरोधकांनीही त्यांच्यावर गेल्या दोन निवडणुकांमध्ये मतदानात हेराफेरी केल्याचा आरोप केला आहे. 

दरम्यान, बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन हाताच्या बोटाच्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. अलीकडेच वन डे विश्वचषकातील एका सामन्यामुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता. श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात शाकिबने मॅथ्यूजला 'टाइम आऊट' बाद घोषित करण्याची मागणी करताच तो चाहत्यांच्या निशाण्यावर आला. दुखापतीमुळे तो न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकेला मुकणार आहे. 

टॅग्स :बांगलादेशराजकारण