कोरोना व्हायरसशी झळ बांगलादेशलाही सोसावी लागत आहे. बांगलादेशमधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बांगलादेशच्या 27 क्रिकेटपटूंनी तेथील सरकारला त्यांचा निम्मा पगार मदत म्हणून दिला. ही रक्कम जवळपास 25 लाखांच्या आसपास असेल. त्यात आता बांगलादेशचा माजी कर्णधार मश्रफे मोर्ताझानं या संकटाशी झगडत असलेल्या 300 गरीब कुटुंबीयांची जबाबदारी खांद्यावर घेतली आहे. पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदीही पाकिस्तानातील 200 कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तू पुरवत आहे.
कोरोना व्हायरसमुळे बांगलादेशमध्येही लॉकडाऊन करण्यात आले आहे आणि त्यामुळे गरीब व रोजंदारी कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. अशा कुटुंबांची काळजी घेण्याचा निर्णय मोर्ताझानं घेतला आहे. त्यानं नरैल आणि लोहगरा उपाझिला येथील 300 गरीब कुटुंबांची जबाबदारी घेतली आहे. मोर्ताझाचा असिस्टंट जामील अहमद सानी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. ''पुढील दोन दिवसांत स्थानिक गरीब कुटुंबांना मदत करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या दोन दिवसांत 300 कुटुंबांची यादी तयार केली जाईल. त्यानंतर त्यांच्या घरी जीवनावश्यक वस्तू पाठवल्या जातील. त्यात पाच किवो तांदुळ, तेल, कडधान्य, बटाटे, मीठ आणि साबण आदींचा समावेश असेल,''असे सानी यांनी सांगितले.
बांगलादेशच्या या माजी कर्णधारानं आर्थिक स्वरूपातही बांगलादेश सरकारला मदत केली आहे. बांगलादेश सरकारला आपल्या निम्मा पगार देणाऱ्या 27 क्रिकेटपटूंमध्ये मोर्ताझाचाही समावेश आहे. मोर्ताझानं नुकतंच कर्णधारपदावरून स्वतःला दूर केले. त्यानं 36 कसोटी, 220 वन डे आणि 54 ट्वेंटी-20 सामन्यांत बांगलादेशचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर एकूण 390 विकेट्स आहेत.
''कोरोना व्हायरसशी संपूर्ण जग लढत आहे. बांगलादेशमध्येही कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आम्ही क्रिकेटपटू आहोत आणि आम्ही लोकांना सोशल मीडियाच्या माध्यामातून योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन करत आहोत. पण, केवळ आवाहन करण्यापेक्षा आम्ही आणखी वेगळ्या पद्धतीनं सहकार्य करू शकतो. त्यामुळे आम्ही 27 क्रिकेटपटूंनी बांगलादेश सरकारला आपला निम्मा पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या सर्वांची निम्मा पगार मिळून ही रक्कम 25 लाखांच्या आसपास पोहोचते,''असे बांगलादेशचा सलामीवीर तमीम इक्बाल यानं सांगितले होते.
जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही 5 लाख 97, 267 इतकी झाली आहे. त्यापैकी 1लाख 33,363 इतकी झाली असून मृतांचा आकडा 27,365 इतका झाला आहे. बांगलादेशमध्ये 48 कोरोना रुग्ण सापडले असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे.