(Marathi News) : बांगलादेशचा स्टार क्रिकेटर आणि मागुरा-1 मतदारसंघातील अवामी लीगचा उमेदवार, शाकिब अल हसन ( Shakib Al Hasan ) याने निवडणुक प्रचारादरम्यान एका चाहत्याच्या कानशिलात लगावले. शाकिबने यापूर्वीही क्रिकेटच्या मैदानावर अनेक राडे घातले आहेत... अम्पायरच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करताना शाकिबने स्टम्पला लाथ मारण्याची घटना नवीन होती आणि त्यात आता ही भर पडली. हा व्हिडीओ एक आठवड्यापूर्वी असल्याचा दावा केला जात आहे. पण, कसंही असलं तरी शाकिब पुन्हा त्याच्या तापट वृत्तीने चर्चेत आला आहे.
स्थानिक मीडियाच्या रिपोर्ट्सनुसार, निवडणुकीच्या दिवशी एका मतदान केंद्रावर शाकिबच्या भवती चाहत्यांचा गराडा पाहायला मिळाला. तो आपले मत देण्यासाठी पोहोचला होता आणि जमावातील एका सदस्याने त्याला मागून पकडले, ज्यामुळे तो संतापला. शाकिबने आपला संयम गमावला आणि त्या व्यक्तीला कानशिलात लगावली.
२०२४च्या राष्ट्रीय निवडणुकीत मागुरा-१ मतदारसंघासाठी अवामी लीगचा उमेदवार असलेला शाकिब देशभर फिरला, नागरिकांशी संवाद साधला आणि त्याच्या प्रचार रॅलींही काढल्या. पण, हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने चाहते संभ्रमात पडले आहेत. वादानंतरही, त्याने निवडणुकीत विजयी झाला.