महिला टी२० विश्वचषकात भारतापुढे आज बांगलादेशचे आव्हान

टीम इंडिया कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 01:34 AM2020-02-24T01:34:42+5:302020-02-24T01:34:56+5:30

whatsapp join usJoin us
Bangladesh face Bangladesh in World T20 World Cup | महिला टी२० विश्वचषकात भारतापुढे आज बांगलादेशचे आव्हान

महिला टी२० विश्वचषकात भारतापुढे आज बांगलादेशचे आव्हान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पर्थ : गतविजेत्या आॅस्ट्रेलियाविरुद्ध शानदार विजय मिळविल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ आयसीसी महिला टी२० विश्वचषक स्पर्धेत सोमवारी आपल्या दुसऱ्या साखळी सामन्यात बांगलादेशच्या आव्हानाला सामोरा जाईल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघ विजयी मोहीम कायम राखण्यास प्रयत्नशील आहे.

लेग स्पिनर पूनम यादवच्या जोरावर भारताने शुक्रवारी सलामीला आॅस्ट्रेलियाचा १७ धावांनी पराभव केला, पण असे असले तरी भारती़य संघ बांगलादेश संघाला कमी लेखण्याची चूक करणार नाही. कारण भारताला या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध २०१८ मध्ये टी२० आशिया चषक स्पर्धेत दोनदा पराभव स्वीकारावा लागला होता. जेमिमा रोड्रिग्स व युवा सलामीवीर फलंदाज शेफाली वर्मा यांचा आशिया चषक संघात समावेश नव्हता, पण भारताला बांगलादेशला पराभूत करायचे असेल, तर आघाडीच्या फळीतील या दोघींना महत्त्वाची भूमिका बजवावी
लागेल.

या दोन संघांदरम्यान गेल्या पाच सामन्यात भारताने तीन, तर बांगलादेशने दोन सामने जिंकले आहेत. सोमवारी विजय मिळवल्यास पाच संघांच्या गटात टीम इंडिया बाद फेरीच्या समीप पोहचेल. भारताला फलंदाजीत सुधारणा करावी लागेल. कारण आॅस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. विश्वचषक स्पर्धेपूर्वी झालेल्या तिरंगी मालिकेतही भारतीय फलंदाजांना कामगिरीत सातत्य राखता आले नव्हते.

तिरंगी मालिकेत छाप पाडणाºया हरमनप्रीत व सलामीवीर स्मृती मानधना यांना सलामी लढतीत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. संघाला या दोघींकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. दीप्ती शर्माने आॅस्ट्रेलियाविरुद्ध ४६ चेंडूंमध्ये ४९ धावा केल्या. ती आपला फॉर्म कायम राखण्यास प्रयत्न करेल. मध्यमगती गोलंदाज शिखा पांडेने आॅस्ट्रेलियाविरुद्ध चांगली कामगिरी केली आणि हरमनप्रीतला संघ एक-दोन खेळाडूंवर अवलंबून नसल्यामुळे आनंद झाला आहे. हरमनप्रीत म्हणाली, ‘आमचा संघ चांगली कामगिरी करीत आहे. सुरुवातीला आम्ही एक-दोन खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून असायचो, पण आता तसे नाही.’ (वृत्तसंस्था)

बांगलादेशवर लक्ष केंद्रित करण्याची गरज - कृष्णमूर्ती
‘भारतीयांनी आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर अतिआत्मविश्वास न दाखवता बांगलादेशवर लक्ष केंद्रित करावे,’ असे मत भारताची फलंदाज वेदा कृष्णमूर्तीने व्यक्त केले. वेदाने सांगितले की, ‘आम्ही कोणत्याही संघाला गृहीत धरणार नाही. काही चांगल्या गोष्टींवर जोर देण्याची गरज आहे. भारताला अजूनही फलंदाजीत सुधारणा करण्याची गरज आहे.’

बांगलादेश संघाची भिस्त अष्टपैलू जहांनारा आलम व आघाडीच्या फळीतील फलंदाज फरगाना हक यांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. २६ वर्षीय हकच्या नावावर टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकाची नोंद आहे. बांगलादेशची सर्वांत अनुभवी खेळाडू कर्णधार सलामा खातून फलंदाजी व गोलंदाजीमध्ये योगदान देण्यास सक्षम आहे. ‘अ’ गटातील अन्य एका लढतीत आॅस्ट्रेलियापुढे श्रीलंकेचे आव्हान राहील. या दोन्ही संघांनी आपले सुरुवातीचे सामने गमावले आहेत.

भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, जेमिमा रोड्रिग्स, दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा, पूनम यादव, राधा यादव, तानिया भाटिया (विकेटकीपर), हरलीन देओल, राजेश्वरी गायकवाड, रुचा घोष, वेदा कृष्णमूर्ती, शिखा पांडे, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकार.

बांगलादेश : सलमा खातुन (कर्णधार), रूमाना अहमद, आयशा रहमान, फहीमा खातून, फरगना हक, जहानारा आलम, खदिजा तुल कुबरा, सोभना मोस्तरी, मुर्शीदा खातून, नाहिदा अख्तर, निगार सुल्ताना (विकेटकीपर),
पन्ना घोष, रितू मोनी, संजीदा इस्लाम, शमीमा सुल्ताना.

Web Title: Bangladesh face Bangladesh in World T20 World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.