नवी दिल्ली : बांगलादेश क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज रूबेल हुसैनने (Rubel Hossain) एक मोठी घोषणा केली आहे. बांगलादेश कसोटी संघाचा प्रमुख चेहरा असणाऱ्या रूबेल हुसैनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. लक्षणीय बाब म्हणजे संन्यास घेण्यामागील कारण अनोखे आहे, कारण युवा खेळाडूंसाठी आपण निवृत्त होत असल्याचे हुसैनने म्हटले आहे. रूबेल हुसैनच्या म्हणण्यानुसार, त्याने युवा खेळाडूंना संधी मिळावी यासाठी कसोटी क्रिकेटला रामराम केले आहे. क्रिकबजने दिलेल्या माहितीनुसार, "युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी मी रेड बॉल क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे", असे रूबेल हुसैनने सांगितले. त्याने त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना फेब्रुवारी 2020 मध्ये खेळला होता. यानंतर 32 वर्षीय गोलंदाज हुसैनला कधीच कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. विशेष बाब म्हणजे हुसैनला त्याच्या कसोटी कारकिर्दीत काही खास कामगिरीही करता आली नाही.
बलात्काराचा झाला होता आरोप 2014 मध्ये बांगलादेशी अभिनेत्री नाझनीनने रूबेल हुसैनवर बलात्काराचा आरोप केला होता. यानंतर रूबेलला बलात्काराच्या आरोपाखाली तुरूंगवास देखील झाला होता. मात्र 2015 मध्ये विश्वचषकाच्या संघात स्थान मिळताच त्याला दिलासा मिळाला आणि तो तुरूंगातून बाहेर निघाला. जवळपास 3 दिवस त्याला तुरूंगात काढावे लागले होते. काही कालावधीनंतर अभिनेत्रीने रूबेलविरोधातील खटला मागे घेऊन त्याला माफ केले असल्याचे स्पष्ट केले होते.
रूबेल हसैनने केली निवृत्तीची घोषणा दरम्यान, 2009 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करून देखील रूबेल हुसैन केवळ 27 कसोटी सामने खेळला आहे. बांगलादेशच्या कसोटी संघाचा प्रमुख गोलंदाज असूनही त्याला अधिक सामन्यात बांगलादेशचे प्रतिनिधित्व करता आले नाही. कसोटीमधील 44 डावांमध्ये त्याने एकूण 36 बळी पटकावले आहेत. त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 166 धावांत 5 बळी अशी राहिली आहे. या सामन्यात त्याने एकूण 210 धावा दिल्या होत्या. तर त्याच्या गोलंदाजीचा सरासरी रेट 3.93 एवढा राहिला आहे.