साऊदम्पटन : उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा कायम राखण्यासाठी बांगलादेशला सोमवारी महत्त्वाच्या लढतीत अफगाणिस्तान संघाचे आव्हान मोडून काढावे लागेल.शुक्रवारी श्रीलंकेविरुद्ध इंग्लंड पराभूत झाल्यामुळे बांगलादेशच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. आता बांगलादेश संघ गुणतालिकेत तळाच्या स्थानावर असलेल्या अफगाणिस्तानविरुद्ध विजयाच्या संधीचा लाभ घेण्यास उत्सुक आहे.मशरफी मुर्तजाच्या नेतृत्वाखालील बांगलादेश आता पाच गुणांसह सहाव्या स्थानी आहे. त्यांनी या स्पर्धेत आतापर्यंत चांगली फलंदाजी केलेली आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध ३२२ धावांचे लक्ष्य त्यांनी केवळ ४१.३ षटकांत गाठले आणि आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत त्यांनी ३८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ३३३ धावांची मजल मारली.शाकिब-अल-हसनला फलंदाजीसाठी आघाडीच्या फळीत स्थान देणे विश्वचषक स्पर्धेत महत्त्वाची बाब ठरली. हा अष्टपैलू खेळाडू आॅस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरच्या तुलनेत केवळ २२ धावांनी पिछाडीवर आहे. वॉर्नर स्पर्धेत सर्वाधिक धावा फटकावणारा फलंदाज ठरला आहे.बांगलादेश संघाची गोलंदाजी विशेष चांगली झाली नाही. कारण त्यांनी तीन सामन्यांत प्रत्येक लढतीत ३२० पेक्षा अधिक धावा दिलेल्या आहेत. गोलंदाजांना कामगिरीत सुधारणा करीत फलंदाजांवरील दडपण काही अंशी कमी करावे लागेल.अफगाणिस्तान संघाला या स्पर्धेत पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. भारताविरुद्धच्या यापूर्वीच्या लढतीत ते प्रेरणा घेतील, अशी आशा आहे. येथील परिस्थिती आणि अनुभव बघता कर्णधार गुलबदिन नायबला पुन्हा एकदा आपल्या फिरकीपटूंकडून चांगल्या कामगिरीची आशाअसेल. वातावरण उष्ण राहण्याची आशा आहे आणि त्यामुळे कोरडी खेळपट्टी फिरकीपटूंना अनुकूल ठरण्याची आशा आहे. भारत-अफगाणिस्तान लढतीत तेच घडले होते. अफगाणिस्तान संघाला सकारात्मक निकाल मिळवण्यासाठी फलंदाजांना प्रदीर्घ वेळ खेळपट्टीवर तळ ठोकावा लागेल. इंग्लंडविरुद्ध त्यांनी या स्पर्धेत प्रथमच ५० षटके खेळली होती. (वृत्तसंस्था)हेड-टू-हेडदोन्ही संघांदरम्यान आतापर्यंत ७ आंतरराष्टÑीय एकदिवसीय सामने झाले असून, त्यापैकी बांगलादेशने ४ सामने, तर अफगाणिस्तानने ३ सामने जिंकले आहेत.दोन्ही संघांमधील शेवटच्या पाच लढतींमधील ३ सामने बांगलादेशने जिंकले आहेत. दोन सामन्यांत अफगाणिस्तानने बाजी मारली आहे.दोन्ही संघांदरम्यान विश्वचषक २०१५ मध्ये केवळ १ सामना झाला असून, तोे बांगलादेशने जिंकला आहे.विश्वचषकामध्ये बांगलादेशने अफगाणिस्तानविरुद्ध २६७, तर अफगाणिस्तानने बांगलादेशाविरुद्ध १६२ धावा केल्या आहेत.सामना : दुपारी ३ वाजल्यापासून(भारतीय वेळेनुसार)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- अफगाणिस्तानविरुद्ध बाजी मारण्यास बांगलादेश उत्सुक
अफगाणिस्तानविरुद्ध बाजी मारण्यास बांगलादेश उत्सुक
उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा कायम राखण्यासाठी बांगलादेशला सोमवारी महत्त्वाच्या लढतीत अफगाणिस्तान संघाचे आव्हान मोडून काढावे लागेल.
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 3:51 AM