Join us  

BAN Vs AFG: ४५ धावांत गमावले ६ विकेट्स, मग १७४ धावांची अभेद्य भागीदारी, बांगलादेशने मिळवला थरारक विजय

Bangladesh Vs Afghanistan: सातव्या विकेटसाठी झालेल्या अभेद्य भागिदारीमुळे बांगलादेशने चार विकेट्स आणि ७ चेंडू राखून थरारक विजय मिळवला. आघाडीचे सहा फलंदाज झटपट माघारी परतल्यावर मेहदी हसन आणि अफीफ हुसेन यांनी मोर्चा सांभाळला आणि संघाला विजय मिळवून दिला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 9:28 AM

Open in App

चितगाव - काल बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात एक थरारक सामना रंगला. या सामन्यात अफगाणिस्तानने २१५ धावा जमवून बांगलादेशसमोर २१६ धावांचे आव्हान ठेवले. मात्र या माफक आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशची घसरगुंडी उडाली. अवघ्या ४५ धावांतच बांगलादेशचे ६ फलंदाज माघारी फिरले. त्यानंतर सातव्या विकेटसाठी झालेल्या अभेद्य भागिदारीमुळे बांगलादेशने चार विकेट्स आणि ७ चेंडू राखून थरारक विजय मिळवला. आघाडीचे सहा फलंदाज झटपट माघारी परतल्यावर मेहदी हसन आणि अफीफ हुसेन यांनी मोर्चा सांभाळला. दोघांनीही सातव्या विकेटसाठी १७४ धावा जोडल्या आणि बांगलादेशच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २१५ धावा जमवल्या. अफगाणिस्तानकडून नजिबुल्लाह जादरानने सर्वाधित ६७ धावांचे योगदान दिले. बांगलादेशकडून मुस्तफिजूर रहमानने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.  तर तस्किन अहमद, शाकिब अल हसन आणि शौरिफूल इस्लामने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

त्यानंतर २१६ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात खराब झाली. बांगलादेशने १३ धावांवर पहिला तर १४ धावांवर दुसरा गडी गमावला. धावसंख्या ४५ धावांपर्यंत पोहोचेपर्यंत बांगलादेशचे पहिले ६ फलंदाज माघारी परतले. मात्र त्याचवेळी सातव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला अफीफ हुसेन आणि आठव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या मेहदी हसनने मैदानावर तळ ठोकला. अफीफने ११५ चेंडूत ९३ आणि मेहदी हसनने १२० चेंडूत नाबाद ८१ धावांची खेळी करताना १७४ धावांची अभेद्य भागीदारी केली. सावध सुरुवात केल्यानंतर दोघांनीही जोरदार फटकेबाजी केली. त्याच्या जोरावर बांगलादेशने ७ चेंडू आणि चार विकेट्स राखून विज मिळवला.  

टॅग्स :आंतरराष्ट्रीय क्रिकेटबांगलादेशअफगाणिस्तान
Open in App