ठळक मुद्देभारताचे माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यानंतर आता बांगलादेशच्या एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार मश्रफे मोर्तझा यानेही राजकारणात धमाकेदार एंट्री केली. बांगलादेशमधील सार्वत्रिक निवडणुकीत मोर्तझा याने अवामी लीग पक्षाकडून नरैल मतदारसंघातून निवडणूक लढवताना मोठ्या मताधिक्याने विजय मिळवलाबांगलादेशमधील सार्वत्रिक निवडणुकीत शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने निर्विवाद विजय मिळवला आहे
ढाका - भारताचे माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे क्रिकेटच्या मैदानानंतर राजकारणाच्या मैदानातही कमालीचे यशस्वी ठरले. आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत बांगलादेशच्या एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार मश्रफे मोर्तझा यानेही राजकारणात धमाकेदार एंट्री केली आहे. नुकत्याच झालेल्या बांगलादेशमधील सार्वत्रिक निवडणुकीत मोर्तझा याने अवामी लीग पक्षाकडून नरैल मतदारसंघातून निवडणूक लढवताना मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. मोर्तझाला त्याच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा तब्बल 34 पट अधिक मते मिळाली.
मोर्तझा याला या निवडणुकीत 2 लाख 74 हजार 418 मते मिळाली. तर त्याचे प्रतिस्पर्धी असलेले जातिया ओइक्या फ्रंट आघाडीचे उमेदवार फरीदुज्जामनान फरगहाद यांना केवळ 8 हजार मते मिळाली. दरम्यान, राजकारणातील आपल्या प्रवेशाचा बचाव करताना मोर्तझा याने क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यावर आपणास बांगलादेशमधील जनतेची सेवा करायची आहे, त्यासाठी राजकारणात जाणे उत्तम ठरेल, अशे म्हटले होते. तसेच निवडणूक लढवण्याची संधी दिल्याबद्दल त्याने पंतप्रधान शेख हसीना यांचेही आभार मानले आहेत.
दरम्यान, बांगलादेशमधील सार्वत्रिक निवडणुकीत शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाने निर्विवाद विजय मिळवला आहे. हसीना यांच्या अवामी लीग या पक्षाच्या नेतृत्वाखाली बनलेल्या आघाडीने 300 पैकी 266 जागांवर विजय मिळवला आहे. तर जतिया पार्टीने 21 जागांवर विजय मिळवला आहे. विरोधी पक्षांच्या नॅशनल युनिटी फ्रंटला केवळ 7 जागांवर समाधान मानावे लागले आहे.
Web Title: Bangladesh ODI Captain Mashrafe Bin Mortaza has won from Narail 2 constituency
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.