जॉर्जटाऊन : बांगलादेशचा एकदिवसीय संघाचा कर्णधार तामिम इक्बालने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकल्यानंतर त्याने आपला हा निर्णय जगजाहीर केला.
बांगलादेशने एकदिवसीय सामन्यांची मालिका ३-० ने जिंकत वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप दिला होता. यानंतर आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून निवृत्ती जाहीर करताना तामिम म्हणाला, ‘आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेमधून मी निवृत्त होतो आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. सर्वांचे मनापासून धन्यवाद.’ बांगलादेशचा हा दिग्गज सलामीवीर शेवटचा टी-२० सामना मार्च २०२० मध्ये खेळला होता. आतापर्यंत खेळलेल्या ७८ टी-२० सामन्यांमध्ये तामीम इक्बालने २४.०८ च्या सरासरीने १७५८ धावा केल्या आहेत. यावर्षी त्याने क्रिकेटच्या या सर्वात छोट्या प्रकारातून सहा महिन्यांसाठी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तो देशांतर्गत टी-२० क्रिकेट स्पर्धासुद्धा खेळला नव्हता.