Mustafizur Rahman :बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान (Mustafizur Rahman) बाबत एक वाईट बातमी समोर आली आहे. मुस्तफिझूर त्याचा बांगलादेश प्रीमियर लीग संघ कोमिल्ला व्हिक्टोरियन्ससोबत सराव करत होता. यावेळी फलंदाज लिटन दासने जोरदार शॉट मारला अन् बॉल मुस्तफिजूरच्या डोक्याला लागला. यामुळे मुस्तफिझूरचे डोके फुटून रक्त वाहू लागले. या घटनेनंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.
सरावादरम्यान मुस्तफिझूरला बॉल लागताच रुग्णवाहिकेत प्राथमिक उपचार देण्यात आले, त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. बॉल इतका जोरात लागला की, त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याची भीती सर्वांच्या मनात आली. पण, हॉस्पिटलमध्ये सीटी स्कॅन केल्यानंतर त्याच्या मेंदूला अंतर्गत दुखापत झाली नसल्याचे समोर आले.
कोमिल्ला व्हिक्टोरियन्सचे फिजिओ एसएम जाहिदुल इस्लाम सजल यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी करुन मुस्तफिझूरच्या दुखापतीबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मुस्तफिजूरच्या डोक्याला दुखापत झाली, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. शस्त्रक्रिया करुन टाकेही घालण्यात आले आहेत. सध्या तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.
आगामी सामने खेळण्यावर प्रश्नचिन्हबांगलादेश प्रीमियर लीगमध्ये कोमिल्ला व्हिक्टोरियन्सला त्यांचा पुढील सामना 19 फेब्रुवारी रोजी सिल्हेट स्ट्रायकर्सविरुद्ध खेळायचा आहे. त्यानंतर त्यांचे रंगपूर रायडर्स आणि फॉर्च्युन बरीशाल यांच्याविरुद्धही सामने आहेत. अशा स्थितीत मुस्तफिजुर रहमान जखमी होणे कोमिल्ला व्हिक्टोरियन्ससाठी धक्क्यापेक्षा कमी नाही. सामन्यापेक्षा मुस्तफिझूर व्यवस्थित होणे महत्वाचे आहे.