मुंबई : आयसीसीने फिक्सिंगप्रकरणी बांगलादेशच्या शकिब अल हसनवर दोन वर्षांची बंदी लागू केली आहे. क्रिकेट जगतामधून शकिबबाबत प्रतिक्रीया येत आहेत आणि यामुळे क्रिकेटसह बांगलादेशचे नाव बदनाम झाल्याचे म्हटले जात आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी शकिबबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे.
बांगलादेशचा अष्टपैलू शकिब अल हसनवर आता दोन वर्षांनी बंदी लादण्यात आली आहे. पण यापूर्वीही शकिबने बरेच प्रताप केले आहेत. त्यामुळे यापूर्वीही शकिबवर बंदी आणली होती. त्यामुळे आता ही दोन वर्षांची बंदी आल्यावर शकिबचे करीअर खल्लास होऊ शकते, असे म्हटले जात आहे.
शेख हसीना यांनी आयसीसीच्या कारवाईचे स्वागत केले आहे. त्या म्हणाला की, "आयसीसीने शकिबबाबत जे पाऊल उचलले आहे, ते योग्यच आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये भ्रष्टाचार होता कामा नये. बांगलादेश आयसीसीच्या निर्णयावर दाद मागू शकत नाही."
शकिबबद्दल शेख हसीना म्हणाल्या की, " शकिबकडून चूक झाली आहे आणि त्याने ती मान्यही केली आहे. त्यामुळे तो आता ही शिक्षा भोगणार आहे. आम्ही आयसीसीकडे दाद मागू शकत नाही, पण शकिबला क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी बांगलादेश क्रिकेट मंडळ त्याला नक्कीच मदत करेल."
शकिब हा सध्याच्या घडीला बांगलादेशचा अनुभवी क्रिकेटपटू आहे. त्याचबरोबर क्रिकेट विश्वामध्ये शकिबने एक गुणवान अष्टपैलू खेळाडू म्हणून नाव कमावले आहे. मैदानातही शकिब कामगिरी दमदार होत होती. आयसीसीच्या अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत तो अव्वल स्थानावर विराजमान होता. पण शकिबने यापूर्वीही काही प्रताप केल्याचे समजते. त्यामुळे यावेळी त्याचे करीअर धोक्यात येऊ शकते, असे म्हटले जात आहे.
बांगलादेश क्रिकेट मंडळाने शकिबवर 2014 साली कारवाई केली होती. 2014 साली शकिब हा एका विदेशी ट्वेन्टी-20 लीगमध्ये खेळला होता. या लीगमध्ये खेळण्यापूर्वी शकिबने बांगलादेशच्या क्रिकेट मंडळाची परवानगी घेतली नव्हती. त्याचबरोबर शकिबने त्यावेळी संघाचे प्रशिक्षक चंडिका हथुरुसिंघा यांच्याबरोबरही वाद घातला होता आणि त्यांचा अनादर केला होता. त्यामुळे त्याच्यावर सहा महिन्यांची बंदी बांगलादेश क्रिकेट मंडळाने घातली होती.