- रोहित नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शनिवारी झालेल्या सामन्यात गत विश्वविजेत्या इंग्लंडचा धुव्वा उडवून विश्वचषक स्पर्धेत विजयी मार्गावर पुनरागमन केल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघ मंगळवारी बांगलादेशच्या कडव्या आव्हानाला सामोरे जाईल. यावेळी, जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या दक्षिण आफ्रिकेला रोखण्याचे मोठे आव्हान बांगलादेशपुढे असेल.
वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडला ४०० धावांचे आव्हान दिल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचा आत्मविश्वास दुणावला आहे. क्विंटन डीकॉक अपयशी ठरल्यानंतरही दक्षिण आफ्रिकेने धावांचा हिमालय उभारला होता. विशेष म्हणजे, वेगवान गोलंदाज मार्को यान्सेन याने झळकावलेले तुफानी अर्धशतक दक्षिण आफ्रिकेला अधिक सुखावणारे ठरले. त्याच्यामुळे दक्षिण आफ्रिकेला तळाच्या फळीत एक दमदार अष्टपैलू खेळाडूचा पर्याय लाभला आहे. इंग्लंडविरुद्धच्या धमाकेदार कामगिरीनंतर दक्षिण आफ्रिकेने नेदरलँड्सविरुद्ध झालेला मानहानिकारक पराभव पूर्णपणे विसरल्याचे दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे सलग सहा एकदिवसीय सामन्यांत त्यांनी ३०० धावांचा पल्ला पार केला असून दक्षिण आफ्रिकेच्या तगड्या फलंदाजीचे मुख्य आव्हान बांगलादेशपुढे असेल. बांगलादेशची मुख्य ताकद कर्णधार शाकिब अल हसन आणि मेहदी हसन मिराज हे आहेत. मात्र, शाकिबची तंदुरुस्ती अजूनही बांगलादेशसाठी चिंतेची बाब ठरली आहे.
‘नक्कीच दक्षिण आफ्रिकेच्या काही खेळाडूंकडे असलेल्या आयपीएल अनुभवाचा संघाला विश्वचषक स्पर्धेत फायदा होत आहे. भारतातील प्रत्येक मैदानाची परिस्थिती वेगळी आहे आणि अशा परिस्थितीत आयपीएल अनुभवाच्या जोरावर संघाला वाटचाल करणे सोपे जात आहे,’ - एडेन मार्करम, फलंदाज, दक्षिण आफ्रिका.
‘दक्षिण आफ्रिकेला या स्पर्धेत आम्ही झंझावाती खेळ करताना पाहिले आहे आणि नेदरलँड्सविरुद्ध हरतानाही पाहिले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष सामन्यातील खेळ महत्त्वाचा ठरेल. मी आता तंदुरुस्त झालो आहे.’ - शाकिब अल हसन, कर्णधार बांग्लादेश.
सामन्याची वेळ : दुपारी २ वाजल्यापासून