Shakib Al Hasan, IND vs BAN 2nd Test: पाकिस्तानविरूद्ध दमदार मालिका विजय मिळवून भारतात आलेल्या बांगलादेशच्या संघाला पहिल्या कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाच्या बलाढ्य फलंदाजीपुढे बांगलादेशचे प्रयत्न तोकडे पडले. प्रथम फलंदाजी करताना अश्विनच्या शतकामुळे भारताला मोठी आघाडी मिळाली होती. त्यानंतर अखेरच्या डावात ५१५ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव २३४ धावांत आटोपला आणि भारताने २८० धावांनी सामना जिंकला. या पराभवानंतर आता बांगलादेशला दुसऱ्या कसोटीआधी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यांचा सर्वात अनुभवी खेळाडू शाकीब अल हसन याच्याबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यात २७ सप्टेंबरपासून दुसरी कसोटी कानपूर येथे खेळली जाणार आहे. या कसोटीसाठी दोन्ही संघ कसून तयारी करत आहेत. पण शाकिब अल हसनच्या खेळण्याबाबत काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शाकिबच्या बोटाला दुखापत झाल्याने पहिल्या कसोटीत ५२ षटकांपर्यंत त्याला गोलंदाजी देण्यात आली नव्हती. त्यामुळे त्याच्या गोलंदाजी क्षमतेवर प्रश्नचिन्ह आहे. आता त्यासंबंधी बांगलादेशचे फिजिओ देबाशिष यांनी महत्त्वाच्या अपडेट्स दिले आहेत.
शाकिब अल हसनची बोटाची दुखापत आताची नाही. त्याला २०२३ च्या वर्ल्डकप दरम्यान दुखापत झाली होती. खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली होती. बांगलादेशच्या संघाचे निवडकर्ते हनान सरकार म्हणाले की, आम्ही शाकिबच्या दुखापतीबाबत लक्ष ठेवून आहोत. त्याच्या तंदुरुस्तीवर संघातील समावेशाबाबत निर्णय घेता येईल.
"शाकिब हा आमचा सर्वोत्तम खेळाडू आहे. तो प्लेइंग ११ मध्ये असला की संघ समतोल असतो. शाकिबला पुढच्या सामन्यासाठी संघात घेण्याआधी आम्ही नक्कीच विचार करू. त्याची दुखापत कितपत बरी आहे हे पाहून आम्ही त्याच्या समावेशवर निर्णय घेतला. आम्हाला एवढ्यातच निर्णय घेता येणार नाही. पुढील दोन दिवस वैद्यकीय टीम त्याच्यावर नीट लक्ष ठेवेल. पुन्हा मैदानात उतरण्याआधी आम्ही फिजियोचा फीडबॅक घेऊ आणि निर्णय घेऊ", असे सिलेक्टर हनान सरकार म्हणाले.