bangladesh student protest news : येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बांगलादेशच्या धरतीवर महिलांच्या ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. मात्र, सध्या बांगलादेशात हिसेंचे वातावरण आहे. बहुतांश ठिकाणी आग, जाळपोळ, मारहाण अशा घटना घडत आहेत. त्यामुळे आगामी स्पर्धेवर सावट असल्याचे आयसीसीच्या निदर्शनास आले. आयसीसी बांगलादेशातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. देशातील हिंसाचार वाढल्यानंतर राजधानी ढाकामध्ये गस्त घालण्यासाठी लष्करी दल तैनात करण्यात आले आहेत.
बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमधील कोटा सिस्टम रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे हिंसक आंदोलन सुरू आहे. काही आठवड्यातच या आंदोलनाची झळ संपूर्ण देशात पसरली. आतापर्यंत झालेल्या आंदोलनात १०५ जणांचा मृत्यू झाला आहे. शेख हसीना यांच्या नेतृत्वातील सरकारने कायदा सुव्यवस्थेची ढासळती परिस्थिती नियंत्रणात आणण्यााठी देशात कर्फ्यू लागू केला असून लष्कराला तैनात केले आहे. लाठ्याकाठ्या, दगडं घेऊन रस्त्यावर उतरलेल्या आंदोलनकर्त्यांनी बसेस, खासगी वाहने यांना आग लावली आहे. आतापर्यंत २५०० हून अधिक आंदोलनकर्ते आणि पोलीस, सुरक्षा यंत्रणा जवानांमध्ये संघर्ष झाला आहे. देशातील मोबाईल इंटरनेट सर्व्हिस बंद करण्यात आली आहे
आयसीसीच्या एका अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, आम्ही जगभरातील हालचालींवर लक्ष ठेवत आहोत. बांगलादेशातील सद्य परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे आताच्या घडीला स्पष्ट काही सांगता येणार नाही. खरे तर बांगलादेशमध्ये ट्वेंटी-२० विश्वचषक होणार आहे.
दरम्यान, महिलांच्या ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी दहा संघांचे दोन गटात विभाजन करण्यात आले आहे. अ आणि ब असे दोन गट आहेत. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड हे एकाच गटात आहेत. यजमान बांगलादेश आणि विश्वचषकासाठी पात्र ठरणारा दुसरा संघ ब गटात असेल. प्रत्येक संघ साखळी फेरीतील चार सामने खेळेल. १७ आणि १८ ऑक्टोबरला उपांत्य फेरीचे सामने होतील. तर २० ऑक्टोबर रोजी ढाका येथे अंतिम सामना होईल.
विश्वचषकातील भारताचे सामने -४ ऑक्टोबर - भारत विरूद्ध न्यूझीलंड६ ऑक्टोबर - भारत विरूद्ध पाकिस्तान९ ऑक्टोबर - भारत विरूद्ध क्वालिफायर ११३ ऑक्टोबर - भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया