Bangladesh Fan Tiger Roby, IND vs BAN 2nd Test: भारत आणि बांगलादेश यांच्यात कानपूरमध्ये खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यावर आतापर्यंत पावसाचा चांगलाच परिणाम झाला आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी केवळ ३५ षटकेच खेळता आली. दुसऱ्या दिवशी पावसामुळे खेळाडूंना मैदानात उतरायलाच मिळाले नाही. पहिल्या दिवशी क्रिकेटशिवाय बांगलादेशी संघाचा एक सुपर फॅन चर्चेत आला. त्याला मारहाण झाल्याची बातमी आली आणि त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. आता या सुपर फॅनबद्दल काही महत्त्वाची माहिती मिळाली असून त्याला भारतातून परत बांगलादेशात पाठवण्यात आले आहे. जाणून घेऊया यामागचे कारण नक्की काय आहे.
कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी गोंधळ
ग्रीन पार्क स्टेडियमवर शुक्रवारी पहिल्या दिवसाच्या खेळादरम्यान, बांगलादेश क्रिकेट संघाचा सुपर फॅन रॉबी टायगरला स्थानिक प्रेक्षकांनी मारहाण केल्याच्या बातम्या येऊ लागल्या. सोशल मीडियावर काही छायाचित्रे आणि व्हिडिओही आले, ज्यामध्ये बांगलादेशी चाहत्याला प्रेक्षकांनी घेरले आणि नंतर पोलिसांनी त्याला घेऊन गेले. यादरम्यान या चाहत्याने टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला शिवीगाळ केल्याचा दावाही करण्यात आला. त्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली. मात्र, नंतर पोलिसांनी सांगितले की, या चाहत्याची प्रकृती खालावली होती, त्यामुळे चाहत्यांनी त्याला घेराव घातला आणि नंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले.
मेडिकल व्हिसा घेऊन मॅच पाहत असल्याचे निष्पन्न
या संपूर्ण प्रकरणात धक्कादायक दावा करण्यात आला आहे. टायगर रॉबीला मेडिकल व्हिसावर बांगलादेशातून भारतात येण्याची परवानगी देण्यात आल्याचे एका वृत्तपत्रात म्हटले आहे. त्याने आपल्या मेडिकल व्हिसामध्ये टीबीच्या उपचाराबाबत नमूद केले होते. त्यामुळे त्याला भारतात येण्याची परवानगी देण्यात आली होती, पण आधी हा चाहता चेन्नईमध्ये त्याच्या टीमला सपोर्ट करताना दिसला आणि नंतर कानपूर टेस्टच्या पहिल्या दिवशीही दिसला. अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, या सुपर फॅनने अद्याप वैद्यकीय व्हिसाच्या अटींचे पालन केले नाही आणि त्याची वैद्यकीय तपासणीही केलेली नाही.
कानपूरमधून हाकलले, भारतातूनही होणार हद्दपार
हा चाहता मेडिकल व्हिसा घेऊन भारतात आला होता पण उपचार घेण्याऐवजी तो फक्त सामना पाहत होता. व्हिसाच्या अटींचे उल्लंघन केल्यामुळे त्याला आता बांगलादेशला परत पाठवले जात असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. कानपूर पोलिसांनी या फॅनला शहरातून परत करून त्याला दिल्लीला पाठवले आहे. तेथून त्याला बांगलादेशची राजधानी ढाका येथे परत पाठवले जाणार आहे. एवढेच नाही तर त्याच्यावर पुढील ५ वर्षांसाठी भारतात येण्यास बंदी घातली जाऊ शकते, असा दावाही करण्यात आला आहे.