Join us  

बांगलादेश विजयाच्या उंबरठ्यावर

न्यूझीलंडने पहिल्या डावात केलेल्या ३२८ धावांच्या प्रत्युत्तरात बांगलादेशने ४५८ धावांचा डोंगर उभारला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2022 5:28 AM

Open in App

माउंट मोनगानुई : वेगवान गोलंदाज इबादत हुसेनने घेतलेल्या ४ बळींच्या जोरावर न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत सामन्यात बांगलादेशचा संघ ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. 

न्यूझीलंडने पहिल्या डावात केलेल्या ३२८ धावांच्या प्रत्युत्तरात बांगलादेशने ४५८ धावांचा डोंगर उभारला होता. १३० धावांनी पिछाडीवर पडलेल्या न्यूझीलंडची दुसऱ्या डावत निराशाजनक सुरुवात झाली. इबादत हुसनने आघाडीची फळी कापून काढल्यामुळे चौथ्या दिवसअखेर न्यूझीलंडची अवस्था ५ बाद १४७ अशी झाली होती. सध्या त्यांच्याकडे १७ धावांची आघाडी आहे. इबादतने पहिल्या डावातील शतकवीर डेवॉन कॉन्वेला १३ धावांवर झटपट माघारी परतवले. त्यानंतर ६९ धावा काढून खेळपट्टीवर स्थिर झालेल्या विल यंगला त्याने तंबूचा रस्ता दाखवला. 

शेवटच्या दिवशी न्यूझीलंडला आता आशा आहे ती ३७ धावांवर खेळत असलेल्या अनुभवी रॉस टेलरकडून. बांगलादेशच्या संघात शाकिब अल हसन, तामीम इक्बाल आणि महमुदुल्लाह या अनुभवी खेळाडूंची अनुपस्थिती असतानाही त्यांनी न्यूझीलंडच्या तोंडाला फेस आणला आहे. न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत खेळलेल्या ३४ सामन्यांत बांगलादेशला एका सामन्यात तेही स्कॉटलंडविरुद्ध विजय मिळवता आला आहे. त्यामुळे  अखेरच्या दिवशी न्यूझीलंडविरुद्ध ऐतिहासिक कसोटी विजय साजरा करण्याचा बांगलादेशचा प्रयत्न असेल. 

न्यूझीलंड (पहिला डाव) : १०८.१ षटकांत सर्वबाद ३२८.बांगलादेश (पहिला डाव) : १७६. २ षटकांत सर्वबाद ४५८ न्यूझीलंड (दुसरा डाव) : टॉम लॅथम त्रि. गो. तास्कीन अहमद १४, विल यंग त्रि. गो. इबादत हुसेन ६९, डेवॉन कॉन्वे झे. इस्लाम गो. हुसेन १३, रॉस टेलर खेळत आहे ३७, हेन्री निकोल्स त्रि. गो. इबादत हुसेेन ०, टॉम ब्लंडल पायचीत गो. इबादत हुसेन ०, रचिन रवींद्र खेळत आहे ६. अवांतर - ८, एकूण : ६३ षटकांत ५ बाद १४७. गडी बाद क्रम : १-२९, २-६३, ३-१३६, ४-१३६, ५-१३६. गोलंदाजी : तास्कीन अहमद ९-१-२२-१, शोरिफूल इस्लाम ११-१-३०-०, मेहेंदी हसन २२-५-४३-०, इबादत हुसेन १७-४-३९-४, मोमिनूल हक ४-०-७-०.

Open in App