जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघ सध्या विश्रांतीवर आहे. टीम इंडियाला पुढील महिन्यात १२ जुलैपासून वेस्ट इंडिजचा दौरा करायचा आहे, जिथे टीमला दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच ट्वेंटी-२० सामने खेळायचे आहेत. वन डे वर्ल्ड कप आणि आशिया चषक पाहता हा दौरा भारतीय संघासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. दरम्यान, टीम इंडियाचा महिला संघ जुलैमध्ये बांगलादेशचा दौरा करणार आहेत. त्यामुळे पुढील महिन्यात भारतीय चाहत्यांसाठी क्रिकेटचा पाऊस असेल.
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या खेळाडू महिला प्रीमियर लीगनंतर विश्रांतीवर आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघ पुढील महिन्यात बांगलादेशचा दौरा करणार आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने ३ सामन्यांच्या वन डे आणि तितक्याच ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी यजमानपदाचा निर्णय घेतला आहे. ट्वेंटी-२० मालिकेपासून या दौऱ्याला ९ जुलैपासून सुरुवात होणार आहे. आगामी मालिकेसाठी भारतीय संघ ६ जुलै रोजी ढाका येथे पोहोचेल.
बांगलादेश महिला क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शफीउल आलम चौधरी नदेल म्हणाले की, बांगलादेश या मालिकेचे यजमानपद भूषवणार आहे. जुलैमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची मर्यादित षटकांची मालिका शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळवली जाईल. ११ वर्षांत पहिल्यांदाच शेर-ए-बांगला स्टेडियमवर महिला क्रिकेट संघाचा आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाईल. बांगलादेशचा महिला संघ या मैदानावर शेवटचा सामना २०१२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता.
वेळापत्रकपहिला T20 सामना - भारत विरुद्ध बांगलादेश - 9 जुलैदुसरा T20 - भारत विरुद्ध बांगलादेश - 11 जुलैतिसरा T20 - भारत विरुद्ध बांगलादेश - 13 जुलैपहिली वनडे - भारत विरुद्ध बांगलादेश - १६ जुलैदुसरी वनडे - भारत विरुद्ध बांगलादेश १९ जुलैतिसरी वनडे - भारत विरुद्ध बांगलादेश - २२ जुलै