नवी दिल्ली ।
सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असलेल्या बांगलादेशच्या संघाने प्रोव्हिडन्स येथे खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात मोठा विजय मिळवला आहे. बांगलादेशने यजमान वेस्ट इंडिजविरूद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात ५५ चेंडू आणि ६ बळी राखून मोठा विजय मिळवला. या विजयासोबतच बांगलादेशने एकदिवसीय मालिकेत १-० ने आघाडी घेतली. तीन बळी पटकावणाऱ्या मेहदी हसन मिराजला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
पहिला सामना पावसाच्या कारणास्तव ४१-४१ षटकांचा खेळवण्यात आला, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना यजमान विडींजच्या संघाने ४१ षटकांत ९ बाद १४९ एवढी धावसंख्या उभारली. विंडीजच्या संघाकडून कोणत्याच फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही, त्यामुळेच संघाला एका मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.
बांगलादेशचा मोठा विजय
दरम्यान, १५० धावांचे लक्ष्य बांगलादेशच्या संघाने केवळ ३१.५ षटकांमध्ये ४ गडी गमावून पूर्ण केले. बांगलादेशकडून ४१ धावांची सर्वाधिक खेळी महमदुल्लाहने खेळली, तर ३७ धावा करून नजमुल हसनने बांगलादेशच्या विजयात हातभार लावला. तसेच कर्णधार तमीम इकबाल याने ३३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. सांघिक खेळीच्या जोरावर बांगलादेशच्या संघाने मालिकेत १-० ने आघाडी घेतली. या सामन्यात मेहदी हसनने ९ षटकात २ मेडन आणि ३ बळी घेत 'प्लेअर ऑफ द मॅच'चा किताब पटकावला.
वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरन याने म्हटले की, "संघाने चांगले प्रदर्शन केले, सामना जिंकण्याचा आम्ही प्रयत्न केला मात्र निकाल आमच्या बाजूने लावण्यात आम्हाला अपयश आले आणि यादरम्यान पावसानेही व्यत्यय आणला. त्यामुळे सामन्याची षटके कमी करण्यात आली. ब्रूक्सने शानदार फलंदाजी करत संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले." बांगलादेशकडून सामनावीर हा किताब मेहदी हसन मिराजने जिंकला मात्र शोरिफुल इस्लामने देखील शानदार गोलंदाजी केली. शोरिफुलने ३४ धावा देऊन ४ बळी पटकावले.