India vs Bangladesh Live Marathi : बांगलादेशच्या गोलंदाजांसमोर भारताचे इतर फलंदाज ढेपाळले असताना युवा फलंदाज शुबमन गिलने ( Shubman Gill) शतक झळकावले. त्याचे हे २०२३ मधील ५ वे शतक ठरले अन् २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५००+ व वन डे क्रिकेटमध्ये १०००+ धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. शुबमननंतर अक्षर पटेलने ( Axar Patel) मोर्चा सांभाळला होता, परंतु मुस्ताफिजूर रहमानने ४९व्या षटकात दोन धक्के दिले अन् बांगलादेशचा विजय पक्का केला. बांगलादेशने आशिया चषकात भारतावर एकमेव विजय २०१२ साली मिळवला होता आणि ११ वर्षानंतर भारतावर त्यांनी विजय मिळवला. या पराभवामुळे टीम इंडियाची नंबर १ बनण्याची संधी गेली.
रोहित शर्मा ( ०), तिलक वर्मा ( ५), इशान किशन ( ५) माघारी परतल्यानंतर लोकेश राहुल व शुबमन गिल यांनी ८७ चेंडूंत ५७ धावांची भागीदारी केली. महेदी हसनने ही जोडी तोडताना लोकेशला ( १९) माघारी पाठवले. सूर्यकुमार यादव ( २६) आणि शुबमन यांनी ४५ धावांची भागीदारी केली खरी, परंतु सूर्या फिरकीपटूंना स्वीप मारताना चाचपडताना दिसला. रवींद्र जडेजाने ( ७) मुस्ताफिजूर रहमानच्या गोलंदाजीवर विकेट टाकली. शुबमनने या वर्षात १००० धावांचा टप्पा ओलांडला आणि यंदाच्या वर्षात असा पराक्रम करणारा पहिला फलंदाज ठरला. त्याने ११७ चेंडूंत शतक पूर्ण केले. भारताला १० षटकांत ७८ धावा हव्या होत्या. शुबमन खेळपट्टीवर होता, परंतु बांगलादेशच्या गोलंदाजांनी धावसंख्येवर चाप लावली होती.
शुबमनची फटकेबाजी भारतीयांना आशेचा किरण दाखवत होती, परंतु एक फटका चूकला अन् होत्याचं नव्हतं झालं. महेदी हसनच्या गोलंदाजीवर षटकारामागून षटकार खेचण्याच्या प्रयत्नात शुबमन बाद झाला. त्याने १३३ चेंडूंत ८ चौकार व ५ षटकारांसह १२१ धावा केल्या. आशिया चषक स्पर्धेत शतक झळकावणाऱ्या सर्वात युवा फलंदाजांमध्ये शुबमन चौथ्या क्रमांकावर आला. त्याने आज २४ वर्ष व ७ दिवसांचा असताना हे शतक झळकावले अन् महेंद्रसिंग धोनीचा २००८ ( २६ वर्ष व ३५४ दिवस) सालचा विक्रम मोडला. सुरेश रैना ( २१ वर्ष व २११ दिवस, २००८), सचिन तेंडुलकर ( २१ वर्ष व ३५० दिवस, १९९५) आणि विराट कोहली ( २३ वर्ष व १२९ दिवस, २०१२) हे आघाडीवर आहेत.
अक्षर दमदार फटकेबाजी करू लागला, परंतु त्याच्या मनगटावर चेंडू आदळल्याने तो वेदनेने कळवळला. पण, त्याने बांगलादेशला चौकार-षटकार मारून रडवले. शार्दूल ठाकूरने त्याला चांगली साथ दिली. मुस्ताफिजूर रहमानने ४९व्या षटकात शार्दूलला ( ११) बाद केले अन् अक्षरसोबत त्याची २७ चेंडूंतील ४० धावांची भागीदारी संपुष्टात आली. पाठोपाठ अक्षरही झेलबाद झाला. त्याने ३४ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ४२ धावा केल्या. ६ चेंडू १२ धावा हव्या होत्या अन् शेवटची विकेट होती. मोहम्मद शणीने चौथा चेंडू चौकार खेचला अन् 2 चेंडू 8 धावा असा सामना आणला. पाचव्या चेंडूवर 2 धावा करण्याच्या प्रयत्नात शमी रन आऊट झाला. भारताचा संपूर्ण संघ 259 धावांत तंबूत परतला.
तत्पूर्वी, शाकिब अल हसन ( ८०) व तोवहिद हृदोय ( ५४) यांनी १०१ धावांची भागीदारी केली आणि त्यामुळे ४ बाद ५९ धावांवरून बांगलादेशला मोठी मजल मारून दिली. लिटन दास ( ०), तांझीद हसन ( १३), अनामुल हक ( ४) आणि मेहिदी हसन मिराज ( १३) हे ५९ धावांवर माघारी परतले. शाकिबने ८५ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारासह ८० धावा केल्या. हृदोय ८१ चेंडूंत ५४ धावांवर झेलबाद झाला. नासूम अहमदने ४५ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ४४ धावा करून संघाला ८ बाद २६५ धावांपर्यंत पोहोचवले. शार्दूल ठाकूरने ३, मोहम्मद शमीने २ विकेट्स घेतल्या.