bangladesh world cup squad 2023 । नवी दिल्ली : वन डे विश्वचषक सुरू होण्यासाठी आता अवघ्या काही दिवसांचा कालावधी उरला आहे. आगामी स्पर्धेसाठी सर्वच संघ भारतात यायला सुरूवात झाली आहे. यजमान भारतीय संघाला स्पर्धेचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी बांगलादेशच्या संघाची घोषणा झाली आहे. बांगलादेशने मंगळवारी विश्वचषक स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. संघाचा माजी कर्णधार तमीम इक्बालला दुखापतीमुळे आगामी स्पर्धेतून वगळण्यात आले आहे.
दरम्यान, आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा देताना नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत राहिलेला इक्बाल विश्वचषकाला मुकणार आहे. खरं तर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या विनंतीवरून एका दिवसातच त्याने आपला निर्णय मागे घेतला होता. तमीम इक्बालने बांगलादेशच्या संघातील सर्वात विश्वासार्ह खेळाडू म्हणून ओळख निर्माण केली आहे. लक्षणीय बाब म्हणजे क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके झळकावणारा तो एकमेव बांगलादेशी आहे. त्यामुळे इक्बाल विश्वचषकाच्या संघात नसणे हा मोठा धक्का मानला जात आहे.
वन डे विश्वचषकासाठी बांगलादेशचा संघ -शाकीब अल हसन (कर्णधार), तन्झिद तमीम, लिटन दास, नजमुल हुसेन शांतो, मुशफिकुर रहीम, महमुदुल्ला, तौहिद हदोय, मेहदी हसन मिराझ, नसुम अहमद, महेदी हसन, तस्किन अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम, तन्झीम हसन.
५ ऑक्टोबरपासून भारतात या बहुचर्चित स्पर्धेचा थरार रंगणार आहे. सलामीचा सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. भारतात तब्बल १२ वर्षांनंतर आयसीसी वन डे विश्वचषकाचे आयोजन होत आहे. आगामी स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर झाला असून अक्षर पटेलचे पुनरागमन झाले आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन संघ जाहीर केला.
विश्वचषकासाठी यजमान भारताचा संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.