ठाणे : बांग्लादेशी नागरिकांना भारतीय पासपोर्ट तयार करून देणाऱ्या टोळीला ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. विशेष म्हणजे अटक केलेला आरोपी हा मूळचा बांग्लादेशचा रहिवासी आहे. त्यानुसार त्याला अटक केली असून न्यायालयाने १६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तपासात त्याने बांग्लादेशातील नागरिकांना देखील भारतीय बनावटीचे पासपोर्ट दिले असल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार कळवा पोलिसांनी सुरत येथे जाऊन तब्बल ११ बांग्लादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. त्यातील तीन आरोपींना कळवा पोलिसांनी अटक केली असून उर्वरित आठ आरोपींना सुरत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यांच्याकडून १२ भारतीय बनावटीचे पासपोर्ट, पश्चिम बंगाल येथे तयार केलेले पाच जन्मदाखले, चार आधार कार्ड, चार पॅनकार्ड आणि चार सिमकार्डसह बांग्लादेश बॅँकेचे दोन एटीएम असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यातही बांग्लादेशी महिला या भारतीय पासपोर्ट तयार करून परदेशात वेश्याव्यवसाय करण्यास जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची नावे राजू ऊर्फ फारूख सफी मोल्ला, (२९ वर्षे, धंदा मच्छी विकी, रा. सहकार रेसिडेन्सी, गुजरात राज्य, मूळ रहिवासी बांग्लादेश), श्रीती राजू मोल्ला ऊर्फ सुमी (२६), मोहम्मद इमोन मोईन खान (३८), मोहम्मद सैपुल अलाउद्दीन मोल्ला (३६) हे सर्वच बांग्लादेश येथे वास्तव्य करणारे असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
ठाणे गुन्हा शाखा घटक १ यांना बांग्लादेशी घुसखोर नागरिक हा विटावा, कळवा ठाणे येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने या भागात सापळा रचून राजू ऊर्फ फारुख सफी मोल्ला (२९) याला अटक केली आहे. तो मच्छीविक्रीचा व्यवसाय करीत होता. चौकशीत त्याच्याकडे कोणतीही कागदपत्रे मिळाली नाहीत. तसेच तो बांग्लादेशचा नागरिक असल्याचेही समोर आले. त्याची चौकशी केली असता, त्याने व त्याचे साथीदार यांनी बांग्लादेशातील महिला व पुरुष यांचे सुरत, गुजरात येथे भारत देशातील बोगस कागदपत्रे तयार केल्याचे निष्पन्न झाल्याने सहायक पोलीस निरीक्षक योगेश काकडे व पोलीस उपनिरीक्षक कैलास सोनावणे यांच्या पथकाने आरोपीसह गुजरात येथे जाऊन गुजरात पोलिसांच्या मदतीने संयुक्त कारवाई करून सुरत येथून ११ बांग्लादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. त्यापैकी कळवा पोलीस ठाण्याचे गुन्ह्याच्या संदर्भातील ३ बांग्लादेशी नागरिक यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली. उर्वरित ८ बांग्लादेशींना पुढील कारवाईकरिता सुरत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
अशी होती गुन्हा करण्याची पद्धत
गुन्ह्याच्या तपासात यातील बांग्लादेशी नागरिक हे छुप्या मार्गाने भारतात प्रवेश करून पश्चिम बंगाल येथे स्थानिक एजंटाद्वारे बनावट कागदपत्र व खोट्या पुराव्यांच्या आधारे जन्मदाखला, आधारकार्ड, पॅनकार्ड तयार करून भारतातील इतर शहरांमध्ये राहण्यास जातात. त्या ठिकाणी जाऊन भाडेकरार करून घर भाड्याने घेतात. त्याद्वारे स्थानिक पत्ता टाकून आधारकार्डचा पत्ता ऑनलाइन अर्ज करून बदलून घेतात. या कागदपत्रांच्या आधारे बँक खाते उघडतात, त्यापैकी काही जण इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करतात. पासपोर्टसाठी आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर ते भारतीय पासपोर्टकरिता अर्ज सादर करून अधिकृत पासपोर्ट काढतात. या पासपोर्टचा वापर करून महिला व पुरुष यांना मॉरिशस, मालदीव आणि बांग्लादेश या ठिकाणी पाठविले जाते.
Web Title: Bangladeshi gang making Indian passports arrested,
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.