पोटचेफ्स्ट्रूम : ‘प्रथमच विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या बांगलादेशच्या खेळाडूंचे वर्तन अशोभनीय होते,’ असे स्पष्ट मत भारतीय १९ वर्षांखालील संघाचा कर्णधार प्रियम गर्गने व्यक्त केले आहे. रविवारी अंतिम लढतीत भारताचा पराभव केल्यानंतर बांगलादेशच्या क्रिकेटपटूंनी जल्लोष करताना मर्यादा ओलांडली. त्यांचा कर्णधार अकबर अलीने यासाठी माफीही मागितली. भारतीय कर्णधार गर्ग म्हणाला की, ‘अशी घटना घडायला नको होती.’
गर्गने म्हटले की, ‘आम्ही शांत होतो. हा खेळाचा एक भाग आहे. कधी तुम्ही जिंकता, तर कधी पराभूत होता. परंतु, त्यांची प्रतिक्रिया अशोभनीय होती. असे घडायला नको होते, पण ठीक आहे.’ सामन्यादरम्यान बांगलादेशचे खेळाडू आक्रमक होते. त्यांचा वेगवान गोलंदाज शरीफुल इस्लामने प्रत्येक चेंडूवर भारतीय फलंदाजांसोबत स्लेजिंग केले. विजयी धाव घेतल्यानंतरही त्याचे वर्तन तसेच होते.
दरम्यान, बांगलादेशचा कर्णधार अकबर अली याने म्हटले की, ‘जे काही घडले ते घडायला नको होते. नक्की काय घडले, याची मला कल्पना नाही. अंतिम लढतीत भावना वरचढ ठरते आणि अनेक खेळाडूंना त्यावर नियंत्रण राखता येत नाही. युवा खेळाडूंनी यापासून स्वत:चा बचाव करायला हवा. आम्हाला प्रतिस्पर्ध्यांचा व खेळाचा आदर करायला हवा. क्रिकेट सभ्य व्यक्तींचा खेळ असून मी माझ्या संघातर्फे माफी मागतो.’ (वृत्तसंस्था)
‘बांगलादेशच्या वर्तनाबाबत आयसीसी विचार करेल’
पोटचेफ्स्ट्रूम : आयसीसीने १९ वर्षांखालील विश्वचषक अंतिम सामन्यातील विजयानंतर बांगलादेशच्या खेळाडूंचा आक्रमकतेने जल्लोष करण्याच्या पद्धतीचा गांभीर्याने विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीसी या सामन्यातील ‘शेवटच्या काही मिनिटांच्या’ फुटेजची समीक्षा करणार आहे, असे भारतीय युवा संघाचे व्यवस्थापक अनिल पटेल यांनी सांगितले.
विजयी धाव घेतल्यानंतर बांगलादेशच्या खेळाडूंनी आक्रमक पद्धतीने जल्लोष केला. त्यांचा कर्णधार अकबर अलीने या घटनेसाठी माफीही मागितली असून भारतीय कर्णधार प्रियम गर्गने बांगलादेशच्या खेळाडूंचे वर्तन अशोभनीय असल्याचे म्हटले आहे. पटेल म्हणाले, ‘नक्की काय घडले, याची आम्हाला कल्पना नव्हती. सगळे निराश होते. आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी अखेरच्या काही मिनिटांचे फुटेज बघितल्यानंतर आम्हाला सांगितले.’ सामन्यादरम्यान बांगलादेशचे खेळाडू आक्रमक होते. त्यांचा वेगवान गोलंदाज शरीफुल इस्लाम प्रत्येक चेंडूवर भारतीय फलंदाजांसोबत स्लेजिंग करीत होता. सामना संपल्यानंतर बांगलादेशचे खेळाडू मैदानात दाखल होत आक्रमकता दाखवीत होते. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली. कोचिंग स्टाफ व मैदानातील अधिकाºयांनी मध्यस्थी करीत परिस्थिती हाताळली.
पटेल यांनी दावा केला की, सामनाधिकारी ग्रीम लोब्रोरे यांनी मैदानावर जे काही घडले त्याबाबत दु:ख व्यक्त केले. पटेल म्हणाले, ‘सामनाधिकाºयांनी स्पष्ट केले की, सामन्यादरम्यान व अखेरच्या सत्रात जे काही घडले त्याबाबत आयसीसी गांभीर्याने विचार करेल. ते फुटेज बघतील आणि त्यानंतर आम्हाला कळवतील.’ (वृत्तसंस्था)
Web Title: Bangladeshi players behavior is not acceptable - Priam Garg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.