नवी दिल्ली : टी-20 विश्वचषकासाठी (T20 World Cup 2022) संघ जाहीर होण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर आहे. अंतिम तारखेच्या एक दिवस आधी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपल्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. आशिया चषकात बांगलादेशच्या संघाने कडवी झुंज दिली होती. शाकिब अल हसनच्या नेतृत्वात पुन्हा एकदा बांगलादेशचा संघ मैदानात असणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे संघातील फलंदाज सौम्य सरकारला 15 सदस्यीय संघात स्थान मिळाले नसून स्टॅंड बायमध्ये जागा मिळाली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर 2022 या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे आणि त्यासाठी सात शहरं सज्ज झाली आहेत. अॅडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये 45 सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड व अॅडलेड ओव्हल येथे अनुक्रमे 9 व 10 नोव्हेंबरला खेळवण्यात येईल. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर 13 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल.
टी-20 विश्वचषकातील विजेता ऑस्ट्रेलिया, उपविजेता न्यूझीलंड यांच्यासह अफगाणिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, भारत, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांना टी-20 विश्वचषक 2022 च्या सुपर-12 मध्ये थेट प्रवेश मिळाला आहे. नामिबिया, स्कॉटलंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांना पहिल्या राऊंडमध्ये खेळावे लागेल. ओमान (फेब्रुवारी) आणि झिम्बाब्वे (जून व जुलै) येथे दोन पात्रता स्पर्धा होणार आहेत आणि त्यातून संघ पहिल्या राऊंडमध्ये सुपर-12 मधील अंतिम चार संघांसाठी एकमेकांना आव्हान देतील.
टी-20 विश्वचषकासाठी बांगलादेशचा संघ - शाकिब अल हसन (कर्णधार), महेदी हसन मिराज, लिटन दास, नुरूल हसन सोहन, शैफ उद्दीन, अबदोत जोसैन, नजमुल हुसेन शांतो, अफिफ हुसैन, शब्बीर रहमान, मुसद्देक हुसैन, यासिर अली, मुस्ताफिजुर रहमान, तस्किन अहमद, हसन महमूद, नसुम अहमद.
स्टॅंड बाय खेळाडू - शोरिफुल इस्लाम, रिषद हुसैन, शक महेदी हसन, सौम्य सरकार.